'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:09 IST2025-02-23T17:04:16+5:302025-02-23T17:09:35+5:30
'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराज शंकराच्या पिंडीला अभिषेक करतात तो प्रसंग दिसतो. हा सीन कुठे शूट झालाय माहिती आहे? (chhaava movie)

'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग
'छावा' सिनेमा (chhaava movie) सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमातील प्रत्येक सीन सिनेमा पाहणाऱ्यांच्या मनात कोरला गेलाय. 'छावा' सिनेमातील असाच एक सीन प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. राज्याभिषेकाआधी छत्रपती संभाजी महाराज शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. 'छावा'मधील हा सीन खूप सुंदर पद्धतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शूट केलाय. 'छावा'मध्ये दिसलेला हा सीन नेमका कुठे शूट झालाय? जाणून घ्या.
या ठिकाणी झालंय शूटिंग
'छावा'मध्ये शंकराच्या मंदिराचा जो सीन दिसला त्याचं शूटिंग सातारा जिल्ह्यात झालं आहे. बारामोटेची विहिर या ठिकाणी 'छावा'मधील या सीनचं शूटिंग झालंय. सातारा शहराकडून जो रस्ता पुण्याकडे येतो तिथे १२ कि.मी. अंतरावर लिंब फाटा लागतो. तिथून आत गेल्यावर लिंब नावाचं गाव आहे. गावातील शेरीची वाडी या ठिकाणी बारामोटेची विहिर आहे. या विहिरीचं स्थापत्यशास्त्र बघून थक्क व्हायला होतं. विहिरीची रचना थक्क करणारी आहे.
या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एकाच वेळी १२ मोटा लावल्या जातात असं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे विहिरीत राजवाडा आणि महालासारखी जागा असलेली दिसते. याशिवाय गेल्या ३०० वर्षात या विहिरीचं पाणी कधीही आटलं नाही, असंही सांगण्यात येतं. या विहिरीचं ऐतिहासिक महत्वही खास आहे.
१२ मोटेची विहिरीचं ऐतिहासिक महत्व
थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी श्रीमंत वीरुबाई भोसले यांच्या कारकीर्दीत या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं. १७१९ ते १७२४ या दरम्यान ही विहीर बांधण्यात आली. लिंब गावात तब्बल ३०० झाडांची आमराई होती. या आमराईला आणि गावातील नागरिकांच्या पाण्याची सोय होण्यासाठी वीरुबाई भोसले यांनी या अनोख्या विहिरीचं बांधकाम केलं. स्थापत्यशास्त्रातील उत्तम नमुना म्हणून या विहिरीच्या बांधकामाकडे पाहिलं जातं. 'छावा'मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या सीनचं याच ठिकाणी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शूटिंग केलंय.