'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:39 AM2018-12-26T08:39:28+5:302018-12-26T13:26:31+5:30

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा वादाच्या कचाट्यात अडकला आहे.

'Thackeray' movie trailer to be released today, but stunted film in the censor board ... | 'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...

'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...

googlenewsNext

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा वादाच्या कचाट्यात अडकला आहे. या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा पहिला टीझर लॉन्च झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. आज दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे, पण या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

अभिजीत पानसे  दिग्दर्शित आणि खासदार संजय राऊत निर्मित बहुचर्चित ठाकरे सिनेमाचा ट्रेलर आज दुपारी 4.00 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय धुरंदर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी प्रदर्शित झालेला 'ठाकरे' सिनेेमाचा टीझर पाहून रसिकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मात्र, तत्पूर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नाही. पण, शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच लाँच होईल, असे स्पष्ट केलं आहे. त्यासाठी, शिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याचेही समजते.  

ठाकरे सिनेमा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची रसिकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीक्षा होती. मात्र, सिनेमाच्या टीझरमधूनच बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. बाळासाहेबांसोबतच उद्धव, राज, मीनाताई ठाकरे, मनोहर जोशी, शरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. मात्र, यातील काही बाबी आजच्या ट्रेलरमधून स्पष्ट होतील, असा अंदाज आहे. 

बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सगळ्यात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. दरम्यान, 23 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Thackeray' movie trailer to be released today, but stunted film in the censor board ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.