'धर्मवीर'मधील हा अभिनेता विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार, पोस्ट करुन केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 16:11 IST2024-08-20T16:09:54+5:302024-08-20T16:11:57+5:30
विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर काल रिलीज झाला. या सिनेमात संतोष जुवेकरनंतर आणखी एक मराठी अभिनेता झळकणार असल्याचं समजतंय (chhaava, vicky kaushal)

'धर्मवीर'मधील हा अभिनेता विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार, पोस्ट करुन केला खुलासा
काल विकी कौशलचा 'छावा' सिनेमाचा टीझर रिलीज झाला. या टीझरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला. विकीचा रुद्रावतार पाहून त्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. अल्पावधीत हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रत्येकजण 'छावा'ची चर्चा करत आहे. अशातच 'छावा'मध्ये एक मराठमोळा अभिनेता झळकणार असल्याचं समजतंय. 'धर्मवीर' सिनेमात अभिनय केलेला कलाकार विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार आहे.
'छावा'मध्ये झळकणार हा मराठी अभिनेता
विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर काल रिलीज झाला. या सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर झळकणार हे आम्ही तुम्हाला सांगितलं. आता याच सिनेमात अभिनेता शुभंकर एकबोटे झळकणार असल्याची माहिती समोर येतेय. शुभंकरने काल 'छावा'चा टीझर शेअर करुन यावर शिक्कामोर्तब केलाय. याशिवाय अभिनेत्री पायल जाधवने शुभंकरला 'छावा'साठी शुभेच्छा दिल्या. शुभंकर 'छावा'मध्ये कोणती भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. शुभंकरला आपण 'धर्मवीर', 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. शुभंकर हा अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे.
'छावा' कधी रिलीज होणाार?
'छावा'च्या टीझरमध्ये विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. शंभूराजांच्या भूमिकेत विकीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही एक पर्वणी असणार यात शंका नाही. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत आहे. ६ डिसेंबरला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे. संतोष जुवेकर आणि शुभंकर एकबोटे सिनेमात कोणत्या भूमिका करणार याचा उलगडा थोड्याच दिवसांमध्ये होईल.