सोनू सूदच्या नावानं लॉन्च झाली सर्वात मोठी थाळी, एकावेळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:08 PM2023-02-19T16:08:59+5:302023-02-19T16:09:59+5:30
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयासोबतच दिलदारपणासाठी ओळखला जातो. प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा अवलिया कलाकार अशी त्याची ओळख आहे.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयासोबतच दिलदारपणासाठी ओळखला जातो. प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा अवलिया कलाकार अशी त्याची ओळख आहे. कोरोना काळात तर तो अनेक गरजूंसाठी देवदूत ठरला होता. त्यानं केलेल्या मदतीचा ओघ पाहता काहींनी चक्क सोनू सूदचं मंदिरही उभारलं. आता तर एका चाहत्यानं सोनू सूदच्या नावानं देशातील सर्वात मोठी थाळी लॉन्च केली आहे. ही थाळी इतकी मोठी आहे की एकावेळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवण करू शकतात. कदाचित २० जणांचं पोट भरेल पण थाळी काही संपणार नाही इतक्या पदार्थांचा समावेश या थाळीत करण्यात आला आहे.
खुद्द अभिनेता सोनू सूदनं या थाळीसोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सोनू सूद या फोटोंमध्ये एका थाळीच्या बाजूला उभे राहिलेले दिसून येतात. ही थाळी पूर्णपणे पदार्थांनी भरली आहे. देशातील सर्वात मोठी जेवणाची थाळी आता माझ्या नावानं ओळखली जाणार आहे, असं कॅप्शन सोनू सूदनं पोस्टला दिलं आहे. एक शाकाहारी व्यक्ती म्हणून जे कमी खाणं पसंत करतात त्यांच्यासाठी ही एक खास थाळी असून एकावेळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवू शकतात इतकी मोठी ही थाळी असल्याचंही सोनूनं म्हटलं आहे. तसंच या थाळीसाठी @gismat_jailmandi चे आभार देखील सोनू सूदनं व्यक्त केले आहेत.
रेस्टॉरंटच्या प्रत्येक ब्रांचमध्ये मिळणार सोनू थाळी
सोनू सूदच्या नावानं सुरू करण्यात आलेली देशातील सर्वात मोठी थाळी ही जगातील पहिली अनलिमिटेड थाळी ठरणार आहे. तुरुंगाच्या थीमवर आपले रेस्टॉरंट चालवणाऱ्या गिस्मत अरेबिक मंडी रेस्टॉरंटनं ही थाळी लॉन्च केली आहे. या थाळीचं लॉन्चिंग कोंडापूर ब्रांचमध्ये झालं. यावेळी सोनू सूदसह इन्स्टाग्रामस्टार पद्दु पद्मावती देखील उपस्थित होती.
सोनू सूदच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या थाळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या रेस्टॉरंटच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. थाळीची लांबी ८ फूट असून सुमारे २० लोक एकत्र बसून स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, "हैदराबाद हे स्वादिष्ट आणि अनोख्या पदार्थांचं माहेरघर आहे. खाद्यप्रेमींना एकाच थाळीत जास्तीत जास्त पदार्थांची चव चाखता यावी यासाठी या मोठ्या थाळीची संकल्पना इतक्या नावीन्यपूर्ण पद्धतीने आणण्यात आली आहे की आजपर्यंत कोणीही विचार केला नसेल". आपल्या नावानं लॉन्च होणाऱ्या या थाळीला पाहून तो खूप आनंदी होता.