सिनेमांच्या शीर्षकांनाही 'राम'नामाची मोहिनी! अपूर्णच राहिला सलमान आणि संजीव कुमार यांचा 'राम'
By संजय घावरे | Published: January 22, 2024 07:16 PM2024-01-22T19:16:24+5:302024-01-22T19:16:31+5:30
Bollywood : मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण देशभर सुरू असलेला रामनामाचा जागर अयोध्येत प्रभू श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याने एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.
मुंबई - मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण देशभर सुरू असलेला रामनामाचा जागर अयोध्येत प्रभू श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याने एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. 'याची देही याची डोळा' प्राणप्रतिष्ठापना सोहळा अनुभवणाऱ्या मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या सिनेमांच्या शीर्षकांनाही रामनामाने मोहिनी घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
१९४३ आणि १९६७मध्ये असे 'राम राज्य' शीर्षक असलेले दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. १९८७मध्ये मनोज कुमार यांनी 'कलयुग और रामायण' या चित्रपटात रामचरित मानसची सांगड चित्रपटाच्या कथानकाशी घातली होती. याखेरीज बऱ्याच चित्रपटांच्या शीर्षकांमध्ये रामाचा उल्लेख आहे. यापैकी काही शीर्षकांमुळे स्मरणात राहणारे ठरले, तर काहींनी बॅाक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत इतिहास रचला. देव आनंद दिग्दर्शित 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटाने एक वेगळीच वातावरण निर्मिती करत त्या काळातील तरुणाईच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढणारा दादा कोंडकेंचा 'राम राम गंगाराम' आजही टेलिव्हीजन लागला की प्रेक्षक आवडीने पाहतात. याखेरीज 'रामायण', 'रामबाण', 'राम लखन', 'राम जाने', 'राम तेरी गंगा मैली', 'राम की गंगा', 'राम भरोसे', 'रामकली', 'घर में राम गली में श्याम', 'राम और श्याम', 'राम तेरे कितने नाम', 'राम अवतार', 'रामशास्त्र', 'आज का एमएलए रामावतार', 'राम बलराम', 'हे राम', 'राम लीला', 'राम गोपाल वर्मा की आग', 'राम सेतू', 'रामपूर का लक्ष्मण', 'राम तेरा देश', 'रामवती', 'रामा ओ रामा' आदी बऱ्याच चित्रपटांच्या शीर्षकांमध्ये राम आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार हा पूर्णावतार मानला जातो, पण 'राम' शीर्षकात असूनही काही चित्रपट मात्र पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. यात सलमान खान आणि संजीव कुमार यांच्या 'राम' आणि 'हे राम' यांचा समावेश आहे. १९९१मध्ये सलमानचा भाऊ सोहेलने 'औजार' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले. त्यापूर्वी जवळपास तीन वर्षे अगोदर सोहेलने 'राम' शीर्षक असलेला सिनेमा सुरू केला होता. यात सलमानसोबत अरबाज खान, पूजा भट्ट आणि नासिर खान मुख्य भूमिकेत दिसणार होते. सुरुवातीला यात सोनाली बेंद्रे दिसणार होती, पण ती बाहेर पडल्यानंतर पूजा भट्टची एन्ट्री झाली, पण पूजासोबत प्रॅाब्लेम झाल्याने चित्रपटच बंद करण्यात आला.
तो 'हे राम' बनलाच नाही...
'सबसे पहले सबसे आखिर लूं मैं तेरा नाम... हे राम' अशी कॅप्शन आणि शशी कपूर यांच्या परसेप्ट इंटरप्रायझेसची प्रस्तुती असलेला 'हे राम' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. बी. आर. इशारा यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटात संजीव कुमार, सुलक्षणा पंडीत, ओम शिवपुरी, प्रेमनाथ अशी तगडी स्टारकास्ट होती. गीतरचना आनंद बक्षी यांनी केली होती, तर संगीताची जबाबदारी राजेश रोशन यांच्याकडे होती.