चित्रपटांवरून राजकारणाचा इतिहास जुनाच, जाणून घ्या असे कोणते आहेत 'हे' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:56 PM2022-03-19T12:56:20+5:302022-03-19T12:57:41+5:30

सोशल मीडियावर आज 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे राजकारण पेटले आहे. या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रमोशन केले आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक मंत्री आणि राजकारण्यांनी याचे कौतुक केले आहे.

The history of politics is old from movies, find out which these movies are | चित्रपटांवरून राजकारणाचा इतिहास जुनाच, जाणून घ्या असे कोणते आहेत 'हे' चित्रपट

चित्रपटांवरून राजकारणाचा इतिहास जुनाच, जाणून घ्या असे कोणते आहेत 'हे' चित्रपट

googlenewsNext

सोशल मीडियावर आज 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे राजकारण पेटले आहे. या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रमोशन केले आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक मंत्री आणि राजकारण्यांनी याचे कौतुक केले आहे. तर विरोधकांनी बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट ११ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

उत्तर प्रदेशसह भाजपशासित ५ राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त केला असून अनेक ठिकाणी भाजप समर्थक तो मोफत दाखवत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने चित्रपटावर तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र,देशाच्या राजकारणात एखाद्या चित्रपटांवरून राजकारण करण्याचा प्रकार कांही आजचाच नाही. यापूर्वीच्या सरकारांमध्येही असे घडले होते. मात्र, याचा फटका बहुतांशी चित्रपटांनाच बसला आहे. अनेक चित्रपटांना बंदीची शिक्षा सहन करावी लागली आहे. पाहू या कोणते आहेत हे चित्रपट.

'गोकुळ शंकर' (१९६३)

  • राजकीय कारणांमुळे भारतात बंदी घातलेला १९६३ सालचा 'गोकुळ शंकर' हा पहिला चित्रपट म्हणता येईल.
  • या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची कथा दाखवण्यात येणार होती.


'गरम हवा (१९७३)

  • देशाच्या फाळणीवर आधारित बलराज साहनी यांच्या 'गरम हवा' या चित्रपटावर १९७३ मध्ये बंदी घालण्यात आली होती.
  • या चित्रपटात एका मुस्लिम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती, त्यानंतर वाद सुरू झाला होता.
  • या चित्रपटावर आठ महिन्यांसाठी बंदी होती.
     

'आँधी' (१९७५)

  • आणीबाणीच्या काळात १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी गुलजार यांच्या 'आँधी' या चित्रपटावर बंदी घातली.
  • यावेळीही राजकारण पेटले होते, अनेक ठिकाणी गदारोळ झाला होता.
  • जनता पक्ष १९७७ मध्ये सत्तेवर आल्यावर या चित्रपटावरील बंदी दूरच झाली. या चित्रपटाचा प्रचारही केला गेला.
     

'किस्सा कुर्सी का' (१९७४)

  • अमृत नाहटा यांचा 'किस्सा कुर्सी का' चित्रपटात इंदिरा गांधीं आणि संजय गांधी यांची कथा दाखवली होती.
  • हा चित्रपट आला, तेव्हा त्यावेळी इंदिरा गांधी सरकारला त्याचे कथानक रुचले नाही.
  • १९७४ मध्ये आलेल्या या चित्रपटावर १९७५ मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्याचे प्रिंट्सही जप्त केले होते.
  • संजय गांधी समर्थकांनी या चित्रपटाच्या मास्टर प्रिंट्स आणि सर्व प्रती सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयातून उचलून जाळल्या.
  • हा चित्रपटाचा नंतर वेगळ्या कलाकारांसह रिमेक करण्यात आला.
     

'सिक्कीम ' (१९७१)

  • १९७५ मध्ये सिक्कीमचे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
  • यात चोग्याल-शासित सिक्कीम एक सार्वभौम राज्य म्हणून दाखवण्यात आले.
  • सप्टेंबर २०१० मध्ये यावरील बंदी उठवण्यात आली.


'खाक और खून ' (१९७९)

  • या चित्रपटावर भारताच्या सेन्सॉर बोर्डाने १९७९ मध्ये देशभरात बंदी घातली.
  • खाक और खून ही नसीम हिजाझी यांची ऐतिहासिक कादंबरी आहे.
  • १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी भारतीय उपखंडातील मुस्लिमांच्या बलिदानाचे वर्णन यात आहे.


'हवायें ' (२००३)

  • १९८४ च्या शीख नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट होता.
  • यावर दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली.


'ब्लॅक फ्रायडे' (२००४)

  • सेन्सॉर बोर्डाने १९९३ च्या बॉम्बस्फोटांवर आधारित या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
  • हुसैन झैदी यांच्या 'ब्लॅक फ्रायडे- द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे ब्लास्ट्स' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित होता.
  • हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता आणि शिवाय १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा निकाल बाकी होता.


'अमू ' (२००५)

  • १९८४ च्या शीख विरोधी दंगलीवर आधारित अमू या सिनेमावरसुद्धा २००५ मध्ये बंदी घालण्यात आली होती.
  • त्याला सुरुवातीला रेटिंग नाकारण्यात आले होते.
  • काही ऑडिओ-कट्स नंतर चित्रपटाला प्रौढ रेटिंग देण्यात आली.


'परझानिया' (२००७)

  • बजरंग दलाने गुजरातमध्ये थिएटर मालकांना या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास सांगितले होते.
  • परझानियाला अनधिकृत बंदीचा सामना करावा लागला.
  • गुजरात दंगलीबद्दल तुरुंगवास भोगावा लागलेल्या बजरंग दलाचा कार्यकर्ता बाबू बजरंगीचे पात्र या चित्रपटात होते.


' तुफान सिंग' (२०१७)

  • तुफान सिंग या पंजाबी चित्रपटावर २०१७ मध्ये बंदी घातली.
  • खलिस्तान लिबरेशन फोर्स सदस्य तुफान सिंग बद्दल हा चित्रपट होता.
  • नंतर हा चित्रपट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला.


यापूर्वी राजेश खन्ना मुख्य भूमिकेत असलेलय 'आज का एमएलए ' या १९८४ च्या चित्रपटाचे 'आज का एमएलए राम अवतार' असे राजकारणामुळे नाव बदलावे लागले होते. मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' (२०१७) चित्रपटाला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणीबाणीची पार्श्वभूमी असून यातील संजय गांधींच्या भूमिकेला ग्रे शेड्स होते. 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक', 'पीएम मोदी', 'द आयर्न लेडी', पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरचा 'द ताश्कंद फाईल्स' यासारख्या चित्रपटांनी रुपेरी पडदा राजकारणांनी व्यापला होता.

प्रादेशिक भाषेतही अनेक प्रचारकी चित्रपट येऊन गेले आहेत. यात महाराष्ट्रात ठाकरे, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एनटी रामाराव यांच्या जीवनावर दोन भागात 'एनटी आर नाथानायूकुडू' आणि 'लक्ष्मीज एनटी आर', वायएसआर रेड्डी यांच्या जीवनावरील 'यात्रा', जयललितांच्या जीवनावरचा कंगनाचा 'थलायवी' असे चित्रपट येऊन गेले आहेत

Web Title: The history of politics is old from movies, find out which these movies are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.