५ हजार तासांचा रिसर्च, ७०० पीडितांच्या मुलाखती अन् ४ वर्षांची मेहनत; असा तयार झाला 'The Kashmir Files' चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:11 PM2022-03-14T20:11:22+5:302022-03-14T20:12:13+5:30
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि आजवरची सर्व मानकं या चित्रपटानं मोडीस काढली आहेत. सामान्यत: कोणत्याही हिट चित्रपटाची चर्चा त्यातील दिग्गज कलाकार किंवा त्यातील गाण्यांमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुरू होते. पण द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबतची सर्वाधिक चर्चा त्यातील दिग्गज कलाकारांबाबत नव्हे, तर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची होत आहे. अर्थात चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनची जबाबदारी विवेक अग्निहोत्री यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती.
दिल्लीत आज पहिल्यांदाच चित्रपटाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी दिग्दर्शकानं पत्रकार परिषद घेण्यात आली. यामागचा मुख्य उद्देश हा चित्रपट बनवण्यामागे घेण्यात आलेले कष्ट, मेहनत आणि रिसर्चची संपूर्ण माहिती सर्वांसमोर येणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चित्रपट बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आणि कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन काम करण्यात आलं याची माहिती त्यांनी दिली.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपट बनविण्यासाठी तब्बल ५ हजार तासांचा रिसर्च केला गेला आहे. १५ हजार पानांचे डॉक्युमेंट एकत्र करण्यात आले आहेत, अशी माहिती विवेक अग्निहोत्री यांनी दिली. जवळपास दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत विवेक अग्निहोत्री यांनी एक २० मिनिटांचा व्हिडिओ देखील दाखवला. यात काश्मिरी पंडितांच्या मुलाखती होत्या की जे त्यावेळी काश्मीरमध्ये उपस्थित होते. पत्नी पल्लवी जोशीसोबत पीडित काश्मिरी पंडितांना भेटण्यासाठी जगभरातील अनेक देश आणि भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. 700 हून अधिक पीडित काश्मिरी पंडितांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्याचं विवेक अग्निहोत्री सांगतात. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी लागला. 20 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये विवेक आणि पल्लवी जोशी विविध ठिकाणी पीडितांशी बोलताना त्यांचे अश्रू पुसताना दिसत आहेत.
काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलण्यात आले ही त्यांची वेदना आहे. पण त्यावेळच्या राजकीय व्यवस्थेने काश्मिरी पंडितांवर नेमके किती अत्याचार केले हे कळू दिले नाही हे सर्वात मोठे दुखणे आहे. सरकारने ही शोकांतिका लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असं विवेक अग्नीहोत्री म्हणतात.