चित्रपटाचे प्रीमिअर उरकलं अन् अभिषेकने ऐशला प्रपोज केले, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:36 PM2023-04-20T13:36:37+5:302023-04-20T13:39:13+5:30
बॉबी देओल हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले.
बच्चन कुटुंबाचं इंडस्ट्रीत एक वेगळंच नाव आहे. या कुटुंबाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लोक लक्ष ठेवून असतात. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)ने विश्व सुंदर ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सोबत लग्न केले तेव्हा या लग्नाची जगभरात चर्चा झाली. 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले. आज हे सेलिब्रिटी कपल त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी..
पहिली भेट
ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याचदरम्यान ऐश्वर्या तिच्या ‘और प्यार हो गया’ या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याचठिकाणी अभिषेक ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.
अशी झाली होती नजरा-नजर
ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे उमराव जानमध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरू’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या ‘गुरू’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गुरू’च्या प्रीमिअरदरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले.
फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज
अभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्यानेयाबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती. 2007 मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी 20 एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले.