सिनेमाचा खराखुरा देव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:26 PM2023-09-26T20:26:08+5:302023-09-26T20:26:31+5:30

Dev Anand : देव आनंद! हिंदी फिल्मसृष्टीचा एव्हरग्रीन सदाबहार चॉकलेट हिरो! भारतातीलच नव्हे तर जगभरातील करोडो हिंदी सिनेमाप्रेमींच्या हृदयाची धडकन! केसांचा कोंबडा, चालण्याची तिरकी चाल, जलद गतीने संवाद बोलण्याची स्टाईल.. अशा अनेक अनोख्या स्टाईल्समुळे गाजलेला हिरो!

The true god of cinema! Dev Anand | सिनेमाचा खराखुरा देव!

सिनेमाचा खराखुरा देव!

googlenewsNext

>>>> राजीव शिंक्रे 

देव आनंद! हिंदी फिल्मसृष्टीचा एव्हरग्रीन सदाबहार चॉकलेट हिरो! भारतातीलच नव्हे तर जगभरातील करोडो हिंदी सिनेमाप्रेमींच्या हृदयाची धडकन! केसांचा कोंबडा, चालण्याची तिरकी चाल, जलद गतीने संवाद बोलण्याची स्टाईल.. अशा अनेक अनोख्या स्टाईल्समुळे गाजलेला हिरो! देव आनंद म्हटला की त्याच्या टोप्या आठवतात, त्याचे स्कार्फ आठवतात, त्याचे रंगीबेरंगी कोट आठवतात. देव आनंदच्या किती आठवणी म्हणून सांगाव्यात..! यंदा देव आनंदचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 

२६ सप्टेंबर १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. ३ डिसेंबर २०११ रोजी लंडनमध्ये त्याचा मृत्यू झाला. १९४६ पासून देव आनंदची सिनेमाची कारकिर्द सुरू झाली. मरेपर्यंत तो आपल्या कामात मग्न राहिला. सिनेमे बनवणे हेच त्याचे उद्दीष्ट होते. नवीन-नवीन विषय घेऊन तो सिनेमे बनवी, तो काळाच्या कितीतरी पुढे होता. नवीन-नवीन कलाकारांना त्याने संधी दिली. झीनत अमान, टीना मुनीम यांना त्यानेच सिनेमात आणले.

देव आनंदने अनेक अभिनेत्रींबरोबर काम केले. सुरुवातीच्या काळात सुरैय्या, मधुबाला, गीताबाली, कामिनी कौशल, नलिनी जयवंत या त्याच्या अभिनेत्री होत्या. त्यानंतर साधना, माला सिन्हा, आशा पारेख, सायराबानू, नूतन यांच्याबरोबर त्याची जोडी जमली. मग आल्या नव्या काळातील अभिनेत्री. हेमामालिनी, राखी, शबाना आझमी, योगिता बाली यांच्यासोबतही तो हिरो म्हणून शोभला. प्रेक्षकांनी नेहमीच त्याच्यावर प्रेम केले. लोक फक्त देव आनंदसाठीच चित्रपट पाहायला जायचे. देव आनंदचे हिरोईनची छेडछाड करणे, तिचा पाठलाग करणे, झाडांच्या आडून तिच्यासह गाणे म्हणणे, त्याचे, हसणे, त्याचे डायलॉग म्हणणे, त्याचे अंगविक्षेप, सगळेच लोकांना आवडे. त्याच्या गाण्यांवर तर लोकांनी जीवापाड प्रेम केले.

दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे... ओ... ओ.... असे गाणे म्हणत हिरोईनची विनवणी करणारा देव आनंद करोडो लोकांचा एकमेव हिरो बनला. खोया खोया चाँद, खुला आसमाँ, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी.' हे गाणे म्हणताना तो ज्या पद्धतीने हात हलवतो ते पाहिल्यावर वाटते की त्याच्या हाताला हाडेच नसावीत. पाहताना खूप विनोदी वाटते, खूप हसू येते पण तरीसुद्धा ते गाणे परत परत पहावेसे वाटते.
तू कहाँ ये बता, इस नशिली रात में, माने ना मेरा दिल दिवाना हाय रे, माने ना मेरा दिल दिवाना अशी साद हिरोईनला घातल्यावर त्या हिरोईन्स धावत पळत त्याच्या मागे यायच्या. देव आनंदसारखा हिरो असल्यावर त्या हिरोईन त्याला वश होणार नाहीत, असे होईल का!? देव आनंदचा एक "चार्म" होता, त्यामुळे तरुणी व स्त्रिया तर घायाळ होतच असत. पण पुरुषसुद्धा त्याच्यावर फिदा होत. त्याच्या प्रत्येक सिनेमाची ते आतुरतेने वाट बघत, देव आनंदला प्रत्यक्ष पाहायला जीवाचे रान करीत. 

ऐसे तो ना देखो, के हमको नशा हो जाए, खूबसूरत सी कोई, हमसे खता हो जाए नंदाला उद्देशून हे गाणे देव आनंद म्हणतो आणि प्रेक्षक आपले देहभान विसरून जातात. देव आनंदच्या चित्रपटांमध्ये एक जादू होती. अडीच तीन तास प्रेक्षक त्याच्या चित्रपटांमध्ये गुंग होऊन जात, सगळे विसरून जात.. आपल्या विवंचना आपल्या अडचणी, घरातील दुःखे, गरीबी... सगळे, सगळे विसरून प्रेक्षक देव आनंदचे सिनेमे बघत आणि तीन तासांनंतर तृप्त मनाने, आनंदी आणि समाधानी चेहऱ्याने थिएटरच्या बाहेर पडत. देव आनंद हा खरंच मानव होता की कोणी खरा ‘देव’ होता? करोडो स्त्री-पुरुषांवर एवढी मोहिनी घालणारा तो खरंच एक ‘देव’ होता का ?

हम हैं राही प्यार के, हमसे कुछ ना बोलिये, जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए, जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिए" देव आनंदने सगळ्यांवरच प्रेम केलं. त्यानं सिनेमावर प्रेम केलं, लोकांवर प्रेम केलं, सृष्टीवर प्रेम केलं आणि सगळ्या जगावरच प्रेम केलं. देव आनंद एक प्रेमपुजारी होता, प्रेमाचा संदेश जगभर पसरवणारा प्रेमपुजारी! नफरत करनेवालों के, सीने में प्यार भर दूँ अरे मैं वो परवाना हूँ, पत्थर को मोम कर दूँ ... देव आनंदने कधी कोणाशी दुश्मनी केली नाही. तो कधी कोणाशी भांडला नाही, कधी कोणाशी त्याने वैर केले नाही. आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्याच्याबरोबर काम केलेले सहकलाकार देव आनंदबद्दल आदरानं बोलतात. 

“ ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हमसफर होता." देव आनंद जेव्हा हिरोईनची छेडछाड करायचा, तेव्हा किती वेगवेगळ्या युक्त्या योजायचा? कधी तिच्या गाडीपुढे उभा राहून तिची गाडी अडवायचा, कधी रेल्वेच्या डब्यांतून तिची छेडछाड करायचा. कधी वेश बदलून तिची गंमत करायचा. असल्या करामती फक्त देवआनंदच करू जाणे. ‘‘ना तुम हमें जानो, ना हम तुम्हें जानें, मगर लगता है कुछ ऐसा.. मेरा हमदम मिल गया’’ देव आनंदचे हिरोईनबरोबरचे रोमँटिक क्षण तर आज फिल्मसृष्टीत अजरामर झाले आहेत. ‘‘तेरे मेरे सपने, अब एक रंग हैं, वो जहाँ भी ले जाए राहें, हम संग हैं.' ‘गाईड’ चित्रपटात वहिदा रहमानला बाहुपाशात घेऊन हे गाणे देव आनंद म्हणतो आणि सगळे प्रेक्षक प्रचंड भावुक होतात.

‘‘दिन ढल जाए, रात ना जाए, तू तो ना आए तेरी, याद सताए..’’ व्हिस्कीचा ग्लास हातात घेऊन वहिदा रहमानच्या आठवणीने तळमळणारा देव आनंद! हे दृश्य पाहून सगळे प्रेक्षक हेलावून जात. ‘‘दिल आज शायर है, गम आज नगमा है, शब ये गज़ल है सनम, गैरों के शेरों को, ओ सुननेवाले, हों इस तरफ भी करम’’ अशी शेर शायरी खास आपल्या ढंगाने सादर करताना देव आनंद किती रुबाबदार दिसतो!!

‘‘ख्वाब हो तुम, या कोई हकिकत, कौन हो तुम बतलाओ, देर से कितने दूर खड़ी हो, और करीब आ जाओ पियानोवर सूट घालून रूबाबात बसलेला देव आनंद हे गाणे म्हणतो आणि हिरोईनबरोबरच प्रेक्षकांचाही दिल खलास होऊन जातो. देव आनंद म्हणजे प्रेम ! देव आनंद म्हणजे खळखळता उत्साह! देव आनंद म्हणजे आयुष्याचा भरपूर आस्वाद घेण्याची वृत्ती! संकटे येवोत, आव्हाने येवोत, सगळ्यांशी सामना करीत, आनंदी वृत्तीने जगण्याची वृत्ती!
‘‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवें में उडाता चला गया.’’ ‘हमदोनो’ या सिनेमातील वरील गाणे म्हणजे देवआनंदच्या आयुष्याचे सार आहे. देव आनंदने या गाण्यातून जीवनाचा संदेश दिला आहे. गेली साठ वर्षे सिनेरसिक देव आनंदचा हा संदेश ऐकत आले आहेत.. हा संदेश ते सगळीकडे नेते आहेत. आनंदी राहा, सुखी राहा.. हे जीवन सुंदर आहे ते मनसोक्त जगा. हे जग सुखी व्हावे, आनंदी व्हावे ही देव आनंदची इच्छा होती. आयुष्यभर तो आपल्या परीने सगळ्यांना आनंदी करण्यासाठी झटला.‘‘सर्वे सुखिन: भवन्तु’’ हेच आपल्या चित्रपटांतून आणि गाण्यांतून सांगणाऱ्या देव आनंदला भावपूर्ण आदरांजली !!

Web Title: The true god of cinema! Dev Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.