अधुरी प्रेम कहाणी ! या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती सिमी गरेवाल, पण बॉलिवूड अभिनेत्रीमुळे नात्यात पडली फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:09 AM2023-10-17T08:09:00+5:302023-10-17T08:10:01+5:30

या क्रिकेटरसोबत सिमी संसार थाटण्याचं स्वप्नं रंगवत होती, पण....

The untold love story cricketer mansoor ali khan and bollywood actress simi garewal | अधुरी प्रेम कहाणी ! या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती सिमी गरेवाल, पण बॉलिवूड अभिनेत्रीमुळे नात्यात पडली फूट

अधुरी प्रेम कहाणी ! या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती सिमी गरेवाल, पण बॉलिवूड अभिनेत्रीमुळे नात्यात पडली फूट

बॉलिवूडमध्ये ‘द लेडी इन व्हाईट’ नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal )आज तिचा 76 वा वाढदिवस (Simi Garewal Birthday ) साजरा करतेय. 17 ऑक्टोबर 1947 रोजी लुधियानात जन्मलेली, इंग्लंडमध्ये वाढलेल्या सिमीने वयाच्या 5 व्या वर्षी राज कपूरचा ‘आवारा’ पाहिला आणि सिनेमासाठी ती अक्षरश: वेडी झाली. सिनेमा आणि सिनेमा हाच एक ध्यास घेऊन ती मोठी झाली. पुढे  दो बंधन, मेरा नाम जोकर, सिद्धार्थ अशा अनेक सिनेमात झळकली. पण आज आम्ही सिमीच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.


कधी काळी सिमी सैफ अली खानचे वडील नवाब मन्सूर अली पतौडी यांच्यासोबत नात्यात होती. मन्सूर अली पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) यांच्यासोबत संसार थाटण्याचं स्वप्नं रंगवत होती. पण  तेच पतौडी एकदिवस ‘इथून पुढे आपल्यातील नातं संपलं,’ असं म्हणून सोडून निघून जातील, असा विचार तिनं स्वप्नातही केला नव्हता. पण झालं तसंच. मन्सूर अली खान पतौडीच्या  आयुष्यात शर्मिला आली आणि तिच्यासाठी त्यांनी सिमीला सोडलं.


शर्मिला आयुष्यात येण्यापूर्वी सिमी व मन्सूर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. बॉलिवूडपासून क्रिकेट जगतापर्यंत या चर्चा सुरू होत्या. पतौडी व सिमी दोघांनाही पाश्चात्य संस्कृती आवडायची. हीच एक आवड दोघांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. क्रिकेटच्या मैदानांपासून पब्लिक इव्हेंटमध्येही दोघेही सतत सोबत दिसत. 

असे म्हणतात की, सिमी ग्रेवालबद्दल नवाब पतौडी चांगलेच गंभीर होते. या नात्याला ते एक नाव देऊ इच्छित होते. पण कदाचित नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. शर्मिला टागौरसोबत (Sharmila Tagore) नवाब पतौडींची ओळख झाली आणि इथून पुढे सगळेच बदलले. शर्मिलाला पाहताच, हीच ती आपल्यासाठी बनलेली मुलगी, असे नवाब पतौडी यांना वाटते आणि तिच्यासाठी त्यांनी सिमीला सोडले.

शर्मिला मोठी स्टार होती. तर मन्सूर पतौडी बॉलिवूडच्या झगमटापासून बरेच दूर होते. म्हणजेच फिल्मी दुनियेत त्यांना फार रस नव्हता. पण एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून नवाव पतौडी व शर्मिला भेटले आणि पहिल्याच भेटीत पतौडी शर्मिलावर भाळले. इतके की, एकेदिवशी थेट सिमीसोबत ब्रेकअप करण्याच्या इराद्याने तिच्या घरी पोहोचले.

डोअर बेल वाजली, सिमीने दरवाजा उघडला. दरवाज्यात मन्सूर पतौडी उभे होते. त्यांच्या चेह-यावर संकोच होता आणि मनात अनेक प्रश्न. सिमीने मन्सूर यांना लिंबू शरबतासाठी विचारले. पण मन्सूर यांनी नकार दिला. मला माफ कर... पण आपल्यातील सर्व काही आता संपलेय. मला कुणी दुसरी भेटलीये, असे एक श्वासात त्यांनी सिमीला सांगून टाकले. सिमी क्षणभर गोंधळली. पण तिने स्वत:ला सांभाळले. इतक्यात मन्सूर पतौडी जाण्यासाठी उठून उभे झालेत. मन्सूर यांनी नकार देऊनही सिमी त्यांना सोडायला बाहेर आली. बाहेर बघते काय, तर ती कुणीतरी बाहेर उभी होती. ती कोण तर शर्मिला टागोर. दोघींचीही नजरानजर झाली आणि काही क्षण शांतता पसरली. यानंतर सिमी काहीही न बोलता तिथून निघून गेली. मन्सूर व शर्मिलाच्या आयुष्यातून ती शांतपणे बाहेर पडली.

मन्सूर पतौडी यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर काही काळानंतर सिमीच्या आयुष्यात रवि मोहनची एन्ट्री झाली. दोघांनीही लग्न केले. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांनी घटस्फोट घेतला.

Web Title: The untold love story cricketer mansoor ali khan and bollywood actress simi garewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.