The Vaccine War Trailer: विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित 'द व्हॅक्सिन वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:56 PM2023-09-12T18:56:05+5:302023-09-12T18:57:01+5:30
‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून कोव्हिड काळात भारताने तयार केलेल्या करोनावरील लसीचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.
‘द काश्मीर फाईल्स’नंतर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता बहुचर्चित असलेल्या ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून कोव्हिड काळात भारताने तयार केलेल्या करोनावरील लसीचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.
जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी भारताच्या वैज्ञानिकांना करावा लागणारा संघर्ष या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलरमध्ये वैज्ञानिकांच्या संघर्षाची झलक पाहायला मिळत आहे. करोना लस तयार करत असताना वैज्ञानिकांच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडत होतं, हेदेखील चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. उत्तम संवाद आणि तगड्या कलाकारांची फौज असलेल्या द व्हॅक्सिन वॉरचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार असून पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.