...तोपर्यंत मराठी भाषेवर प्रेम करू लागले होते - कृती सनोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:00+5:30
कृती सनोनने मराठी भाषेचे धडे गिरविले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कृती सनोन हिचा पानिपत हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात पार्वतीबाईंची भूमिका तिने साकारली आहे. तिने या भूमिकेसाठी खास मेहनत घेतली. तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण देखील घेतले होते. इतकंच नाही तर मराठी भाषेचे धडे देखील गिरविले होते.
पानिपत चित्रपटात मराठी भाषा इतक्या चांगल्याप्रकारे कृती बोलली आहे. याबद्दल ती म्हणाली की, मला मराठी येत नाही, हे खरं; पण चित्रपटात जे काही थोडे मराठी संवाद होते, ते अस्सल मराठी वाटावेत, याची मी काळजी घेतली. ते संवाद मी सहजतेने बोलत आहे, असं वाटण्यची मी काळजी घेतली. पूर्वीही मी तेलुगू चित्रपटात भूमिका साकारताना तेलुगू भाषेतून संवाद म्हटले होते. त्या तुलनेत मराठी भाषा नक्कीच सोपी होती. तसंच सेटवर माझे मराठी उच्चार अस्सल वाटावेत, याकडे लक्ष देण्यसाठी एका मराठी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मी आजच्या नव्हे, तर त्या ऐतिहासिक काळातच वावरत आहे, अशी मी कल्पना केली आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर योग्य ते भाव उमटले. तसंच त्या काळातील ते कपडे परिधान केल्यामुळेही मला मी ऐतिहासिक काळात वावरत असून मी पार्वतीबाई बनल्याची भावना निर्माण झाली. चित्रीकरण संपत आलं, तोपर्यंत मी मराठीवर प्रेम करू लागले होते.
देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या असंख्य युध्दांवर आधारित चित्रपटांची बॉलीवूडमध्ये पूर्वीपासूनच निर्मिती होत होती. ज्या शूर योद्ध्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांचा गौरव करणाऱ्या असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली आहे.
आता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर शनिवार, २९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.