...तर रनवे ३४ अजिबात बनविला नसता, खुद्द अभिनेता अजय देवगणचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 05:26 PM2022-10-08T17:26:31+5:302022-10-08T17:27:07+5:30
Ajay Devgan : अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनीत ‘रनवे ३४’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan)चा काही दिवसांपूर्वी 'रनवे ३४' (Runway 34) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अजय देवगणनं फक्त अभिनयच नाही तर दिग्दर्शनही केले आहे. ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर ‘रनवे ३४’ या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर होणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
अजय देवगण म्हणाला की, मी चित्रपटांच्या सेटवरच लहानाचा मोठा झालो आहे. दिग्दर्शकाला मदत करण्यापासून संकलन आणि कॅमेरा चालवणं अशी अनेक कामं मी केली आहेत. आज एक अभिनेता म्हणून मी जो काही आहे, तो या सर्व अनुभवांचा परिपाक आहे. एक अभिनेता म्हणून मला नवी आव्हानं स्वीकारण्यास मी नेहमीच तयार असतो. नवीन काहीतरी करण्याचं मला खूप कुतुहल असतं. विमान प्रवासाशी संबंधित नाट्य आपल्याकडे क्वचितच हाताळलं गेलं असून मला ते फार आवडतं. या चित्रपटाच्या पटकथेत खूपच नाट्य, भावना, थरार आणि गूढ यांचं मिश्रण झालं आहे. प्रेक्षकांना या हवाई नाट्यचा अनुभव देण्यासाठी त्यांना ते नाट्य वास्तव वाटलं पाहिजे. विमान, त्यातील कर्मचारी आणि एकंदर हवाई प्रवास वगैरे सर्वकाही अस्सल वाटलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहतील, तेव्हा ते त्यावर खिळून जातील. झी सिनेमा वाहिनीच्या प्रेक्षकांना रनवे ३४ चित्रपट निश्चितच पाहायला आवडेल, असा आहे.
त्याने पुढे सांगितले की, दिग्दर्शकाची खुर्ची ही अनेक जबाबदाऱ्या घेऊन येते. मुळात तुम्हाला चित्रपट कसा दिसेल, त्याची दृष्टी स्पष्ट असायला हवी. तसंच तुमची ही दृष्टी तुम्हाला तुमच्या कलाकारांनाही दिसून आली पाहिजे. तसं झालं, तरच तो पूर्णपणे तुमचा चित्रपट बनतो आणि मग तुम्ही तो अगदी निर्दोषपणे निर्माण करू शकता. लॉकडाऊनच्या काळात ‘रनवे ३४’चा प्रकल्प माझ्याकडे आला. मी जसजसा त्याच्या पटकथेवर विचार करू लागलो, तसतसं हा चित्रपट मीच दिग्दर्शित केला पाहिजे, असं मला वाटायला लागलं. मला त्या वकिलाच्या भूमिकेत अमितजीच दिसत होते आणि त्यांनी जर या भूमिकेला नकार दिला असता, तर मी हा चित्रपट अजिबात बनविला नसता. त्यामुळे जेव्हा त्यांनी या भूमिकेला होकार दिला, तेव्हा ‘रनवे ३४’ बनविण्याची नवी उर्मी माझ्या मनात उसळली.