...तर 'रामायण'ची सीता झाली असती 'राम तेरी गंगा मैली'ची हिरोईन; या कारणामुळे हातातून गेला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:01 PM2024-05-28T12:01:40+5:302024-05-28T12:02:25+5:30
Mandakini : राज कपूरचा चित्रपट 'राम तेरी गंगा मैली'मधून अभिनेत्री मंदाकिनी रातोरात लोकप्रिय झाली. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि आजही या चित्रपटासाठी ती ओळखली जाते. फार कमी लोकांना माहित आहे की, या चित्रपटासाठी मंदाकिनी पहिली पसंती नव्हती.
राज कपूरचा चित्रपट 'राम तेरी गंगा मैली'मधून अभिनेत्री मंदाकिनी रातोरात लोकप्रिय झाली. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि आजही या चित्रपटासाठी ती ओळखली जाते. फार कमी लोकांना माहित आहे की, या चित्रपटासाठी मंदाकिनी पहिली पसंती नव्हती. तर रामायणातील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया होती. मात्र एका कारणामुळे तिला नाकारण्यात आले.
दीपिका चिखलियाला आज कोण ओळखत नाही... ३६ वर्षांपूर्वी, रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली होती. टीव्हीमध्ये तिची कारकीर्द बहरली असली तरी तिला बॉलिवूडमध्ये छाप पाडता आली नाही. दरम्यान, दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला की तिने १९८५ मध्ये आलेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी राज कपूरशी संपर्क साधला होता. पण वयामुळे तिला नाकारण्यात आले.
दीपिका चिखालिया म्हणाली की, त्या काळात एक नायिका म्हणून मी छोटे-छोटे चित्रपट करत होते, ज्याचा मला आनंद नव्हता. मी इंडस्ट्रीपासून दूर होतेय असे वाटत होते. राज कपूरची मुलगी रिमाची जिवलग मैत्रीण माझ्या वडिलांची मैत्रीण होती. त्यांनी मला सांगितले की राज कपूर चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत आहेत आणि त्यांच्याशी बोलू शकतो. अभिनेत्री पुढे म्हणाली की, मी राज कपूर यांना भेटायला गेले होते. त्यांनी माझे वय विचारले. मी १७ वर्षांचे होते. ते म्हणाले तू खूप लहान आहेस. मी तुला सांगतो. यानंतर, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा अभिनेत्री मंदाकिनी ब्रेस्ट फिडिंग करताना आणि पारदर्शक साडीने आंघोळ करतानाच्या सीनवरून बराच वाद झाला होता, ज्यामुळे तिला असे समजले की नाकारणे तिच्यासाठी वरदान ठरले.
अभिनेत्री म्हणाली, मी माझ्या आईसोबत चित्रपट पाहायला गेले होते आणि मला धक्काच बसला. मी देवाची आभारी आहे की बरे झाले माझी चित्रपटात निवड झाली नाही. नाहीतर मी नाकारू शकले नसते. मी राम तेरी गंगा मैलीमध्ये काम केले असते तर मी कधीच रामायणाची सीता बनू शकले नसते, याची मला जाणीव झाली.
राज कपूरचा शेवटचा चित्रपट राम तेरी गंगा मैली होता, ज्यामध्ये राजीव कपूर आणि मंदाकिनी मुख्य भूमिकेत दिसले होते.
चित्रपट वादग्रस्त ठरला तरी हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले.