"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:07 IST2025-01-25T14:04:12+5:302025-01-25T14:07:07+5:30
Chhava Movie: 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केलीय.

"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत
विकी कौशलचा आगामी चित्रपट 'छावा'चा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केलीय.
संतोष जुवेकरने इंस्टाग्रामवर जिममध्ये घाम गाळून कशी पिळदार शरीरयष्टी बनवली, त्याची झलक दाखवली आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ''मेहनतीला पर्याय नाही!! जेव्हा लक्ष्मण उतेकर सरांनी मला निवडलं "छावा" साठी तेव्हा शूटिंग सुरू होण्याआधी सुरू केलेली तयारी ते शूटिंगपर्यंतचा प्रवास मांडतोय. टप्या टप्याने येतोय, लक्ष असूदेरे महाराजा. जय भवानी जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रवास.'' या चित्रपटात संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारलीय. त्याच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
'छावा'साठी संतोषने घेतलं या गोष्टींचं प्रशिक्षण
संतोष जुवेकरने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत छावासाठी कोणत्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतले याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या गटात सगळेच पराक्रमी, वीर योद्धेच होते. त्यामुळे फक्त विकी कौशलचीच नाही तर प्रत्येक कलाकाराची भूमिका महत्वाची आहे. मी याआधी कधीच घोडेस्वारी शिकलो नव्हतो ते यानिमित्ताने शिकलो. साधंसुधं नाही तर अगदी घोडदौड करणं इंग्रजीत galloping असं म्हणतात तेही शिकलो. आता मी महिन्यातून २-३ वेळा पुण्यात घोडेस्वारी करतो. शिवाय तलवारबाजी, दांडपट्टा, भाल्याचं प्रशिक्षण असा सगळाच कमाल अनुभव घेतला.