सुशांतने पाठीवर काढलेल्या टॅटूत दडलेली होती अनेक रहस्ये, वाचून व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:22 PM2020-07-07T12:22:45+5:302020-07-07T12:23:00+5:30
सुशांतच्या पाठीवरचा टॅटू आणि त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानिमित्ताने वेगळ्या चर्चाही ऐकू येत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत गेला पण जाताना अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेला. सुशांतच्या आत्महत्येनंतर आजही त्याचे चाहते दु:खातून सावरू शकलेले नाहीत. सोशल मीडियावर सुशांतचे जुने फोटो, जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तूर्तास सुशांतच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, सुशांतच्या पाठीवरचा टॅटू आणि त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानिमित्ताने वेगळ्या चर्चाही ऐकू येत आहेत.
सुशांतने 2016 मध्ये पाठीवर टॅटू बनवला होता. सुशांतने बराच विचार केल्यानंतर हा टॅटू बनवला होता. यात त्याची अनेक सीक्रेट दडलेली होती. ‘पहिला टॅटू... पंचतत्व, आई आणि मी...,’ असे या टॅटूचा पहिला फोटो शेअर करताना सुशांतने लिहिले होते.
या टॅटूमध्ये त्याने पंचतत्व बनवून घेतले होते. टॅटू आर्टिस्ट समीर पतंगे याने हा टॅटू बनवला होता. आधी सुशांत हा टॅटू मानेवर काढणार होता. मात्र बहिणीच्या सल्ल्यानंतर त्याने तो पाठीवर गोंदवला होता. सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. आईशी जोडलेली प्रत्येक आठवण सुशांतने अखेरपर्यंत जपली होती. त्याच्या पाठीवरचा हा टॅटूही या आठवणींचा एक भाग होता.
पंचतत्वामध्ये तो आणि त्याची आई एकच आहेत, असा या टॅटूचा अर्थ होता.
आईलाच समर्पित केली होती शेवटची पोस्ट
सुशांतने आत्महत्येपूर्वी त्याच्या आईसाठी पोस्ट लिहिली होती. त्याची ही शेवटची पोस्ट ठरली. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटोही शेअर केला होता. ‘अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगूर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजेच आई...,’ असे त्याने या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते.