लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ५ वेबसीरिजचे शूटिंग झालंय नयनरम्य ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल
By तेजल गावडे | Published: September 22, 2020 07:00 AM2020-09-22T07:00:00+5:302020-09-22T07:00:00+5:30
लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच वेबसीरिज रिलीज झाल्या. या सीरिजमधील कथानक, पात्र आणि लोकेशन्सनी रसिकांच्या मनात घर केले.
लॉकडाउनच्या काळात चित्रपट व मालिकांचे शूटिंग बंद होते. अशामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अनेकांचे मनोरंजन झाले. या काळात बऱ्याच चांगल्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील काही वेब सीरिज नयनरम्य ठिकाणी म्हणजेच बर्फाच्छादित शिखरांमधील हिमालयात, सुंदर खोऱ्यांमध्ये, पर्वतात आणि वाळवंटात शूट झाल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या वेबसीरिज
बेबाकी- ऑल्ट बालाजी आणि झी5 क्लबची ही नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज त्यातील कलाकार आणि सुंदर कथानक यांमुळे चर्चेचा विषय झाली आहे. मात्र, ही मालिका शिमल्यातील निसर्गरम्य स्थळांवर चित्रीत झाली आहे ही बाबही दुर्लक्ष करण्याजोगी अजिबात नाही. या मालिकेतील कलावंत शिमल्यातील मॉल रोडवर भटकत असताना प्रेक्षक श्वास रोखून धरायला लावणाऱ्या खोऱ्याची झलक पहायला मिळतेय. यातील प्रेम त्रिकोणाच्या कथेत मध्यवर्ती व्यक्तिरेखा कैनात, इम्तियाज आणि सुफियान यांच्यातील प्रेम हिमाच्छादित शिखरांमध्ये फुलतो, हे एवढे सुंदर व मनात रेंगाळणारे आहे की पुन्हा-पुन्हा बघावेसे वाटते. या वेब सीरिजमध्ये कुशल टंडन, शिवज्योती राजपुत आणि करण जोतवानी हे कलाकार आहेत.
काफिर- झी 5वरील ही वेबमालिका काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आहे पण प्रत्यक्षात शूटिंग हिमाचल प्रदेशात करण्यात आले आहे. कैनाझ अख्तर या निष्पाप पाकिस्तानी मुलीच्या सत्यकथेवरून काफीर प्रेरित आहे. यात कैनाझची भूमिका दिया मिर्झाने केली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चुकीने दहशतवादी समजल्यामुळे या मुलीला तुरुंगात जावे लागते. हे सगळे भाग बघताना प्रेक्षक काश्मीर खोऱ्याच्या तसेच पर्वतरांगा व नद्यांच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दृश्यांच्या प्रेमात पडतात. या वेबमालिकेत दिया मिर्झा आणि मोहित रैना हे कलाकार आहेत.
बॉस- बाप ऑफ द स्पेशल सर्व्हिसेस- ऑल्टबालाजीची ही मालिका शिमल्यातील विस्मयकारी स्थानिक ठिकाणांवर चित्रीत झाली आहे. मालिकेची कथा एका लफंग्यावर तसेच एसीपीवर आधारित आहे. हिल स्टेशनवरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिमल्याचे पोलिस प्रमुख एक विशेष कृती दल स्थापन करतात. लफंग्या इन्स्पेक्टरची भूमिका करण सिंग ग्रोव्हरने केली आहे, तर एसीपी साक्षीची भूमिका सागरिका घाटगेने केली आहे.
बंदिश बँडिट्स- अलीकडेच लाँच झालेली ही अॅमेझॉन प्राइम ओरिजिनल वेबमालिका जोधपूरच्या राजेशाही स्थापत्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झाली आहे. बंदिश बँडिट्स या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने बिकानेर व जोधपूर या शहरांमध्ये झाले आहे. अगदी पहिल्या भागापासूनच या वेबमालिकेतील पारंपरिक राजस्थानी घटकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये पारंपरिक पेण्टिंग्ज, काउचेस, भिंती, झोपड्या आणि राजवाड्यांचा समावेश होता. बंदीश बँडिट्स ही मालिका हिंदुस्तानी शास्त्रीय गायक राधे आणि पॉपस्टार तमन्ना यांच्यावर आधारित आहे. यात ऋत्विक भौमिक, श्रेया चौधरी, नासिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत.
आर्या- सुष्मिता सेनच्या बहुप्रतिक्षित पुनरागमनामुळे चर्चेत आलेली डिस्नी+ हॉटस्टार ओरिजिनल वेबमालिका आर्याचे संपूर्ण शूटिंग जयपूरमध्ये झाले आहे. या वेबमालिकेत काही सुंदर राजवाडे आणि राजस्थानातील स्थानिक सेटअप्स दाखवले आहेत. यातील अनेक दृश्यांमध्ये समृद्ध राजस्थानी सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडते. या वेबमालिकेचे कथानक एक प्रेमळ पत्नी व आईभोवती फिरणारे आहे. या स्त्रीला कुटुंबाच्या अवैध नार्कोटिक्स व्यवसायात पडण्याची अजिबात इच्छा नाही. वेबमालिकेत सिकंदर खेर, चंद्रचूड सिंग आणि सुष्मिता सेन हे कलाकार आहे.