‘हे’ आहेत अभिनेत्रींचे आर्मी डॅड्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 12:15 PM2017-05-09T12:15:44+5:302017-05-09T17:45:44+5:30
अबोली कुलकर्णी वडील आणि मुलीचे नाते हे एकमेकांच्या अत्यंत जवळचे असते. मग ते आॅनस्क्रीन असो किंवा आॅफस्क्रीन. ही नात्यांची ...
वडील आणि मुलीचे नाते हे एकमेकांच्या अत्यंत जवळचे असते. मग ते आॅनस्क्रीन असो किंवा आॅफस्क्रीन. ही नात्यांची वीण आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही तशीच दृढ राहते. मुलींना नेहमीच आपल्या ‘डिअर’ डॅडींचा अभिमान वाटत असतो. त्यात वडील जर देशासाठी कार्य करत असतील, तर मग त्यांना वडिलांबाबत वाटणाऱ्या अभिमानात भरच पडते. ‘बी टाऊन’ मध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे वडील आर्मीत होते. पाहूयात, अशा कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ते...
अनुष्का शर्मा
बिनधास्त, बेधडक आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा हिच्याकडे पाहिले जाते. अनुष्काचे वडील हे आर्मीमध्ये होते. तिने बंगळुरू येथील आर्मी स्कूलमधून तिचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती मुंबईत मॉडेलिंगसाठी आली. तिने तिच्या करिअरची सुरूवात ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापासून केली. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले. या दोन्ही चित्रपटांसाठी तिला फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रियांका चोप्रा
बॉलिवूडसोबतच आता हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा झेंडा रोवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिचे वडील डॉ.अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा हे आर्मीत फिजिशियन होते. प्रियांकाचे वडील आता या जगात नाही. मात्र, प्रियांका तिच्या वडिलांची लाडकी मुलगी होती. आजही तिने तिच्या हातावर ‘डॅडीज गर्ल’ अशा नावाचा टॅटू काढून घेतला आहे.
प्रिती झिंटा
बॉलिवूडमध्ये ज्या अभिनेत्रीच्या केवळ एका गोड हास्यावर चाहते फिदा आहेत अशी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा. तिचे वडील दुर्गानंद झिंटा हा मेजर होते. आता ते या जगात नाहीत. मात्र, प्रितीने अभिनयाच्या क्षेत्रात जावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून तिने ‘दिल से’ मधून डेब्यू केला. तसेच ‘सोल्जर’,‘ क्या कहना’,‘कल हो ना हो’,‘कोई मिल गया’,‘वीर जारा’,‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या चित्रपटांत काम करायला सुरूवात केली.
सुष्मिता सेन
‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिचे वडील सुबीर सेन भारतीय सैन्यदलात विंग कमांडर होते. तिने १९९६ मध्ये ‘दस्तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ‘सिर्फ तुम’,‘बीवी नंबर १’,‘आँखें’,‘मैं हूं ना’,‘ मैंने प्यार क्यों किया’,‘जिंदगी रॉक’,‘आग’ यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.
लारा दत्ता
‘मस्ती’,‘काल’,‘नो एंट्री’,‘पार्टनर’,‘ हाऊसफुल्ल’,‘चलो दिल्ली’ यासारख्या चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री लारा दत्ता ही एल.के.दत्ता या आर्मीतील विंग कमांडरची मुलगी आहे. तिने २००३ मध्ये ‘अंदाज’ या चित्रपटातून डेब्यू केला आहे.
सेलिना जेटली
हॉट अॅण्ड ब्युटीफुल अभिनेत्री सेलिना जेटली हिचे वडील वी.के. जेटली हे आर्मीत कर्नल होते. २००३ मध्ये ‘जानशीन’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला आहे. तसेच तिने त्यानंतर ‘नो एंट्री’,‘टॉम डिक एंड हॅरी’,‘गोलमाल रिटर्न्स’, ‘थँक्यू’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
चित्रांगदा सिंग
‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ मधून डेब्यू करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही आर्मी बॅकग्राऊंडमधील आहे. तिचे वडील निरंजन सिंग हे आर्मीत कर्नल होते. तिने ‘सॉरी भाई’,‘देसी बॉईज’,‘जोकर’,‘इंकार’,‘आई मी और मैं’,‘अंजान’,‘गब्बर इज बॅक’ यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.