बॉलिवूडमधून संन्यास घेत साध्वी बनली ही अभिनेत्री? संजीव कुमार यांच्यासोबत बांधणार होती लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:32 PM2023-03-21T16:32:42+5:302023-03-21T16:33:06+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने साध्वी झाल्यानंतर स्वतःचे नावदेखील बदलले.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक नायिका झाल्या आहेत, ज्यांनी एकेकाळी चित्रपटाच्या पडद्यावर राज्य केले, पण नंतर कोणी अभिनय सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, तर कोणी साध्वी बनले. त्या हिरोइन्सनी घेतलेल्या या अचानक निर्णयाने चाहत्यांनाही धक्का दिला. अभिनेता विनोद खन्ना यांनीही चित्रपटसृष्टी सोडली आणि संन्यासी बनले. मात्र, नंतर ते परतले. पण काही नायिका अजिबात परत येऊ शकल्या नाहीत आणि सर्व ऐहिक सुख, आसक्ती आणि संसाराचा त्याग करून साध्वी झाल्या. आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने ७० आणि ८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. ती त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जात होती. पण नंतर ती साध्वी झाली. ही अभिनेत्री आहे नीता मेहता. तीच नीता मेहता जिला एकेकाळी अभिनेते संजीव कुमारशी लग्न करायचे होते.
नीता मेहता यांचा जन्म १९५६ मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील वकील होते, तर आई डॉक्टर होती. कुटुंबात ना फिल्मी वातावरण होते, ना कुणाला या क्षेत्रात यायचे होते. पण नीता मेहता यांनी केवळ हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहिले. नीता मेहता यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्यांना फक्त अभिनेत्री व्हायचं होतं. नीता मेहता यांना नायिका बनण्याचे इतके वेड लागले होते की, त्या आपल्या कुटुंबाच्या विरोधात गेल्या होत्या.
नीता मेहता यांनी मुंबईतील शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. इथून दोन वर्षांचा कोर्स केल्यानंतर नीता मेहता यांना चित्रपटांमध्ये अगदी सहज ब्रेक मिळाला. १९७५ मध्ये आलेला 'पोंगा पंडित' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात नीता मेहता यांच्यासोबत रणधीर कपूर होते. यानंतर नीता मेहता यांनी 'ईंट का जवाब पत्थर', 'मंगल पांडे', 'ये है जिंदगी', 'आखरी इंसाफ', 'कमचोर', 'रिश्ता कागज का', 'जानने दुश्मन', 'हीरो' आणि 'सुलतनत' हे चित्रपट केले. यासह अनेक चित्रपट केले.
नीता मेहता यांनी विनोद खन्ना ते राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्यासोबत काम केले. नीता मेहता यांनी संजीव कुमारसोबत चार-पाच चित्रपट केले. एकत्र काम करत असताना नीता मेहता आणि संजीव कुमार एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही लग्न करायचे होते. पण संजीव कुमारच्या एका अटीने सर्व काही बिघडले.
नीता मेहता यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करू नये, अशी संजीव कुमार यांची इच्छा होती, असे म्हटले जाते. मात्र नीता मेहता यांना हे मान्य नव्हते. नीता यांनी तर चित्रपटात काम करण्यासाठी कुटुंबाविरुद्ध बंड केले होते, मग त्या संजीव कुमारचे कसे ऐकणार? नीता मेहता यांनी नकार दिल्याने संजीव कुमार आणि त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर नीता मेहता यांनी आपल्या करिअरकडे लक्ष वळवले.
पण हळूहळू नीता यांना चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळणे बंद झाले. हे ८० च्या दशकातील आहे. त्यानंतर त्यांनी सहाय्यक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. नीता मेहता काही चित्रपटांत मोठ्या बहिणीच्या, तर काही चित्रपटांत नायकाच्या वहिनीच्या भूमिकेत दिसू लागल्या. नीता मेहता यांनी जवळपास ४० चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. यामध्ये 'हमसे बढकर कौन', 'नौकर बीवी का' आणि 'स्वर्ग से सुंदर' या चित्रपटांचा समावेश आहे. पण नंतर एक वेळ आली जेव्हा नीता मेहता यांना सहाय्यक भूमिकाही मिळत नव्हत्या. त्यानंतर नीता मेहता यांनी चित्रपट कायमचे सोडले आणि दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला.
नीता मेहता यांचा हा दागिन्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. पण अचानक नीता मेहता यांच्या लक्षात आले की चित्रपट किंवा व्यवसाय हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश नाही. त्या काहीतरी वेगळं शोधत होत्या. त्यानंतर त्या सर्व काही सोडून साध्वी झाल्या. एवढेच नाही तर नीता मेहता यांनी आपले नावही बदलले. आता त्यांचे नाव स्वामी नित्यानंद गिरी आहे. त्यांचे युट्युब चॅनेल देखील आहे, जिथे त्या त्यांचे जीवन अनुभव शेअर करत असते.