Aamir Khan birthday : ‘त्या’ प्रसंगानंतर आमिर खानं अमरिश पुरी यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.., वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:54 PM2023-03-14T12:54:33+5:302023-03-14T12:55:01+5:30
Aamir Khan birthday : ‘जबरदस्त’ या सिनेमाचं शूटींग सुरू होतं. याच चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि अमरीश पुरी यांची गाठ पडली होती. पण या सिनेमावेळी असं काही घडलं की, या सिनेमानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही.
Aamir Khan birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी (Amrish Puri ) आज आपल्यात नाहीत. पण एकेकाळी त्यांचा मोठा दरारा होता. अमरीश पुरी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात ते फार शांत स्वभावाचे होते. त्यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमिर खान (Aamir Khan) आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.
होय, साल होतं १९८५. नासिर हुसेन यांच्या ‘जबरदस्त’ या सिनेमाचं शूटींग सुरू होतं. याच चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि अमरीश पुरी यांची गाठ पडली होती. पण या सिनेमावेळी असं काही घडलं की, या सिनेमानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. अगदी अमरीश पुरी आहेत, म्हणून आमिरने अनेक सिनेमे नाकारल्याचंही ऐकायला मिळतं.
तर ‘जबरदस्त’चं शूटींग सुरू होतं. सनी देओल, संजीव कुमार, रती अग्निहोत्री, अमरीश पुरी, राजेंद्रनाथ अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात आमिरचा रोल काय होता तर, तो नासिर हुसेन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यावेळी आमिर ना स्टार होता, ना त्याला फारसं कुणी ओळखत होतं. नासिर यांनी आमिरवर ॲक्शन डिपार्टमेंटची जबाबदारी सोपवली होती. आमिरचं काम होतं, कलाकारांना ॲक्शन सीन समजून सांगण्याचं. आमिरने त्यानुसार, अमरिश पुरी यांना एक ॲक्शन सीन समजावून सांगितला. पण कॅमेरा समोर आला की, अमरिश पुरी यांना सीन काही केल्या जमेना. त्याचे हातवारे चुकत होते आणि यामुळे नासिर वैतागले होते.
आमिर सारखं अमरिश पुरींना सीन समजावून सांगत होता. मात्र अमरिश पुरी यांना काही केल्या जमेना. बरेच रिटेक झालेत, सेटवरचा माहोलही तापला. अशात आमिर पुन्हा अमरिश पुरीकडे सीन समजावून सांगण्यासाठी गेला. झालं, आधीच अमरिश पुरींचा पारा चढलेला होता. ते आमिरवर सर्वांसमोर भडकले. आमिर बिचारा काहीही न बोलता तसाच थिजल्यासारखा उभा राहिला. काही वेळाने त्याने पुन्हा एकदा अगदी शांतपणे अमरिश पुरी यांना सीन समजावून सांगितला. सीन ओके झाला, तसा अमरिश पुरींचा रागही शांत झाला. आपण विनाकारण आमिरवर चिडलो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच आमिरची माफी मागितली. अर्थात आमिर तो प्रसंग कधीच विसरू शकला नाही. अमरिश पुरी वयाने, अनुभवाने मोठे आहेत, म्हणून त्यावेळी तो शांत राहिला. पण तो अपमान तो कदाचित त्याला विसरता आला नाही. आमिरने त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.