Tiger 3: सलमानच्या 'टायगर ३'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी करणार बंपर कमाई, कलेक्शनचे आकडे समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 01:32 PM2023-11-12T13:32:31+5:302023-11-12T13:33:45+5:30
सलमानच्या 'टायगर ३'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 'टायगर ३' सिनेमा पहिल्याच दिवशी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत 'टायगर ३' अखेर दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला. सलमान खानच्या या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. १२ नोव्हेंबरला 'टायगर ३' चित्रपट प्रदर्शित करत भाईजानने त्याच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. दरवर्षी सलमान खान दिवाळीत त्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका करतो. आता यंदाच्या दिवाळीत त्याचा 'टायगर ३' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. सलमानच्या 'टायगर ३'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
'टायगर' आणि 'टायगर झिंदा है' या चित्रपटांनंतर 'टायगर ३'साठी प्रेक्षक उत्सुक होते. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. 'टायगर ३'ने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच २० कोटींची बंपर कमाई केली आहे. आता पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तज्ज्ञांकडून 'टायगर ३'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमानचा 'टायगर ३' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४० कोटींचा गल्ला जमवू शकतो. दिवाळीचा पहिला दिवस असूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ही क्रेझ पाहता 'टायगर ३' सिनेमा पहिल्याच दिवशी ४० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
'टायगर ३' हा २०१४ साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर सिनेमाचा तिसरा भाग आहे. पहिला भाग सुपरहिट ठरल्यानंतर टायगरचा सीक्वेल 'टायगर जिंदा है' २०१७ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'एक था टायगर'ने पहिल्या दिवशी ३२ कोटींची कमाई करत देशात १९८ कोटी तर जगभरात ३२० कोटींचा गल्ला जमवला. तर 'टायगर जिंदा है' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी ३४ कोटींचा गल्ला जमवत जगभरात ५५८ कोटींची कमाई केली होती. 'टायगर ३' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असलेल्या 'टायगर ३' सिनेमात इमरान हाशमी, रिधी डोगरा, आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मनिष शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३०० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.