टिक-टॉक पुन्हा एकदा संकटात, आणखी एका टिक-टॉक स्टारवर करण्यात आली कारवाई, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:13 PM2020-05-22T13:13:28+5:302020-05-22T13:15:30+5:30
टिक-टॉक वादात अडकले असताना या अॅपला आणखी एक झटका लागला आहे. टिक-टॉकच्या एका स्टारवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.
TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिक-टॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे. ज्या टिक-टॉकला 4.5 चे रेटिंग होते. प्रत्येक दिवसाला हे रेटिंग आणखी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असेच राहिले तर टिक-टॉकचे रेटिंग लवकरच एक पेक्षा देखील कमी होईल अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. प्ले स्टोरवरचे टिक-टॉकचे रेटिंग एक पेक्षा कमी झाल्यास याचा टिक-टॉकला भारतात मोठा धक्का बसेल यात काहीच शंका नाही. गेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिक-टॉक काढून टाकले आहे. यावरूनच टिक-टॉकचे भविष्य अंधारात आहे असा अंदाज आपण लावू शकतो.
टिक-टॉक वादात अडकले असताना या अॅपला आणखी एक झटका लागला आहे. टिक-टॉकच्या एका स्टारवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. टिक-टॉक स्टार सोनू नायकला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली होती. पण आता तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सोनूने लॉकडाऊनच्या काळात इसानपूर ब्रीजवर व्हिडिओ शूट करून तो टिक-टॉकवर अपलोड केला होता. त्यामुळे तिच्यावर ही कारवाई केली होती.
सोनूच्या इतर व्हिडिओंप्रमाणे हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर तिच्यावर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. सोनू केवळ २१ वर्षांची असून ती एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते.
इसानपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जे एम सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला असून या व्हिडिओत सोनू बोलताना दिसत आहे की, मोदीजी कृपया देशातील लॉकडाऊन उठवा आणि त्यानंतर आम्हाला या ब्रीजवर झोपून दाखवा...