टाइम बदल गया है : इरफान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2016 08:50 AM2016-10-14T08:50:33+5:302016-10-17T15:24:15+5:30
प्राजक्ता चिटणीस पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात इरफान खानने एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ...
पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात इरफान खानने एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबत त्याने सीएनएक्ससोबत मारलेल्या खास गप्पा...
इरफान तू सध्या इन्फर्नो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यग्र आहेस, वेगवेगळ्या देशात या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
युरोप, अमेरिका सगळीकडेच मी प्रमोशनासाठी फिरत आहे. आपल्यापेक्षा हॉलिवूडमध्ये प्रमोशन हे खूप वेगळ्या पद्धतीने केले जाते. प्रमोशन कशा पद्धतीने करायचे हे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीपासूनच ठरलेले असते. या चित्रपटात तर फ्रान्स, इटली, भारत अशा वेगवेगळ्या देशातील कलाकार आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या देशात खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या देशात तसेच इतर काही देशातही प्रमोशन करत आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने मला वेगवेगळ्या देशातील कलाकारांना, लोकांना भेटण्याची संधी मिळत आहे.
टॉम हँक्स यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
टॉम हँक्स यांची लोकप्रियता ही केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. अनेक देशांत त्यांचे फॅन्स आहेत. त्यांचे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मी अनेकवेळा ऐकले होते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्यासोबत काम करताना ते केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही किती चांगले आहेत हेदेखील मला कळले. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर मी टॉम हँक्स यांच्या प्रेमात पडलो आहे.
हॉलिवूडमध्ये तू ज्यावेळी काम करण्याचा विचार केलास, त्यावेळी भारतीय कलाकारांना हॉलिवूडमध्ये तितक्या चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. पण आज खूपच वेगळी परिस्थिती आहे. याबाबत तुला काय वाटते?
मी सुरुवातीला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार केला त्यावेळी तुला केवळ वेटर अथवा ड्रायव्हरच्या भूमिका साकारायला मिळतील असे बॉलिवूडमधील माझ्या अनेक मित्रांचे म्हणणे होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज आपल्या कलाकारांनादेखील खूप चांगल्या भूमिका मिळत आहेत. माझ्यासोबतच प्रियांका चोपडा, दीपिका पादुकोण हॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. मला हॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी माझी भूमिका ही मला अतिशय चांगल्याप्रकारे साकारायची केवळ हेच माझ्या डोक्यात होते. पहिल्या भूमिकेमुळे मला भविष्यात आणखी भूमिका मिळाल्या पाहिजेत हा विचार करूनच मी काम केले होते.
बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवतो?
आपल्याकडे अभिनेता हा स्टार असतो. त्याच्यानुसार चित्रपटाची कथा अनेकवेळा लिहिली जाते. पण हॉलिवूडमध्ये कथा ही स्टार असते. तिथे कोणत्याही कलाकारापेक्षा कथेला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच आपल्यापेक्षा त्यांचे बजेट कित्येक पटीने अधिक असते. तांत्रिकदृष्ट्यादेखील ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत आहेत. चित्रीकरणाच्यावेळी युनिटही त्यांच्याकडे मोठे असते.
भविष्यात हॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अधिक वेळ कोणत्या इंडस्ट्रीला द्यायचा असे तू ठरवले आहेस?
बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असे मी ठरवले आहे. मी दोन्ही इंडस्ट्रींनाही तितकाच वेळ देणार आहे. माझ्यासाठी इंडस्ट्रीपेक्षा कथा ही अधिक महत्त्वाची आहे. मला ज्या चित्रपटाची कथा आवडेल त्या चित्रपटात मी काम करेन.