शहरांच्या नावांवर चित्रपटांचे शीर्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2016 12:42 PM2016-02-28T12:42:07+5:302016-02-28T05:50:10+5:30
समलैंगिक विषयावरील अलिगड हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील एका शहराच्या नावावर या चित्रपटाचे शीर्षक आहे. या ...
शुक्रवारी रिलीज झालेला हंसल मेहताचा ‘अलीगढ’ हा चित्रपट याच सीरिजमधला म्हणता येईल. अलीगढची कथा तेथील एका विश्वविख्यात युनिर्व्हसिटीमधील प्राध्यापकावर आधारित आहे. ज्याला समलैंगिकतेच्या आरोपावरून सस्पेंड केले गेले. त्यानंतर त्याने कायदेशीर लढा देत त्याच्यावर झालेली कारवाई प्रशासनाला मागे घेण्यास भाग पाडले.
यूपीतील शहरांवर आधारित असलेल्या चित्रपटांची जर चर्चा करायची झाल्यास यामध्ये सर्वात मोठे नाव बनारस शहरावर आधारित असलेल्या चित्रपटाचे आहे. २००६ मध्ये रिलीज या चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज पराशर (चालबाज फेम) यांनी केले. त्यात उर्मिला, नसीरुद्दीन शाह, डिंपल कापडिया, अश्मित पटेल आणि राजबब्बर यांची प्रमुख भूमिका होती. आंतरजातीय प्रेम कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात बनारसमधील परंपरा तेथील रितीरिवाज दाखविण्यात आल्याचा दावा केला गेला. मात्र बनारसच्या जनतेने चित्रपटात केलेला दावा नाकारला. १९७३ मध्ये देवआनंदची प्रमुख भूमिका असलेला ‘बनारसी बाबू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात योगिता बाली आणि देवआनंदच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली. यूपीची राजधानी असलेल्या लखनऊ शहरावर गेल्या वर्षी ‘लखनवी इश्क’ हा चित्रपट आला होता. नवे चेहरे असलेल्या या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळवता आले नाही.
अशीच स्थिती दिल्लीनजीक असलेल्या गाजियाबादमधील गॅँगस्टरांवर आधारित ‘जिला गाजियाबाद’ या चित्रपटाची झाली. संजय दत्त, विवेक ओबेरॉय, अरशद वारसी, परेश रावल आणि रवी किशन यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असतानादेखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नाही.
गाजियाबाद शहराजवळील मेरठ शहरावर आधारित २०१५ मध्ये अनुराग कश्यप यांनी ‘मेरठिया गॅँगस्टर’ या नावाने चित्रपट बनविला. मात्र हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला. काही महिन्यांपूर्वी ‘मेरठ सेंट्रल’नावाने चित्रपट बनविण्याची देखील घोषणा केली गेली. तसेच ‘बरेली के बाजार’ या नावाने देखील चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू आहे.