upcoming web series: 'या' ५ बहुप्रतिक्षीत वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:11 PM2021-09-06T18:11:37+5:302021-09-06T18:14:13+5:30
Web series: गेल्या २ वर्षामध्ये ओटीटीवरील प्रेक्षकवर्ग वाढला असून वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरुणाईचा वावर वाढला आहे. त्यामुळे हा काळ ओटीटी प्लॅटफॉर्मचा असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या ओटीटीकडे असलेला प्रेक्षकांचा कल पाहता अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आपले चित्रपट याच प्लॅटफॉर्मवर रिलीज करत आहेत. गेल्या २ वर्षामध्ये ओटीटीवरील प्रेक्षकवर्ग वाढला असून वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. म्हणूनच, येत्या काळात नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन या ओटीटीवर कोणत्या नव्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार ते पाहुयात.
१. कोटा फॅक्ट्री 2 (Kota Factory) -
२०१९ मध्ये कोटा फॅक्ट्री ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. त्यानंतर आता या सीरिजचा पुढचा भाग कोटा फॅक्ट्री २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये लहान मुलांचे कोचिंग क्लासेस, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांच्या अपेक्षा या सगळ्याचा मुलांवर होणारा परिणाम यावर ही सीरिज आधारित आहे. घर सोडून शिक्षणासाठी कोटा येथे गेलेल्या मुलाच्या जीवनावर आधारित या सीरिजचं कथानक आधारलेलं आहे.
२. जामताडा सीजन 2 -
लो बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. फोन फ्रॉडच्या माध्यमातून लहान मुलांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते यावर ही सीरिज आधारलेली आहे. जामताडा या सीरिजचा दुसरा सीजन लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
३. दिल्ली क्राइम 2 -
प्रचंड लोकप्रिय झालेली वेब सीरिज म्हणजे दिल्ली क्राइम. दिल्लीतील निर्भया हत्याकांडावर आधारित या सीरिजच्या दुसऱ्या सीजनमध्ये अभिनेत्री शेफाली शाह, रसिका दुग्गल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
४. फाइंडिंग अनामिका -
फाइंडिंग अनामिका या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दिक्षित पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ही एक थ्रिलर वेब सीरिज असून यात एका सुपरस्टार अभिनेत्रीची कथा दाखवली जाणार आहे.
५. लिटिल थिंग्स 4 -
तरुणाईला विशेष भूरळ घालणाऱ्या लिटिल थिंग्सचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीजनमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक नवी कथा उलगडली जाणार आहे.