ट्रॅजेडी सिनेमांचा दिलीप कुमारांवर होऊ लागला होता गंभीर परिणाम, जावे लागले होते सायकॅट्रिस्टकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:17 AM2021-07-07T09:17:35+5:302021-07-07T09:18:00+5:30
ट्रॅजिक भूमिकांचा दिलीप कुमार यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ लागला होता.
दिलीप कुमार एकेकाळी असे चित्रपट करत होते की त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखू लागले होते. त्या काळात प्रेक्षकांना दुःखद शेवट असणारा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागला होता आणि दिलीप कुमार सातत्याने तशाच चित्रपटात काम करू लागले होते. त्या पात्रांच्या जीवनातील ट्रॅजेडीचा दिलीप कुमार यांच्या खासगी जीवनावर परिणाम होऊ लागला होता आणि तेव्हा त्रस्तावलेल्या दिलीप कुमार यांना सायकॅट्रिस्टकडे उपचार घ्यावे लागले होते.
दिलीप कुमार यांनी या गोष्टीचा उल्लेख बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यांनी सांगितले होते की, मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांनी ट्रॅजेडी सिनेमा न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी कॉमेडी सिनेमात काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी विनोदी चित्रपटात काम करायला सुरूवात केली होती.
दिलीप कुमार यांनी सांगितले होते की, ट्रॅजेडी सिनेमांचा त्यांच्यावर खूप काळ गंभीर परिणाम झाला होता. मात्र अशा सिनेमांचा चित्रपटातील कलाकाराच्या तब्येतीवर परिणाम होतो. रोज सकाळी उठा, आंघोळ करून फ्रेश होऊन स्टुडिओत पोहचा तर कोणता तरी मरण्याचा सीन, त्रासदायक सीन अशाप्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीच्या मानसिक तब्येतीवर परिणाम करतो. लहान वयात या गोष्टींचा तब्येतीवर जास्त वाईट परिणाम होतो. त्यासाठी मी ड्रामा कोचसोबत बातचीत केली होती आणि त्यांचा सल्ला घेतला होता. काही सायकॅट्रिस्ट होते, त्यांचे सल्ले घेतले होते.
दिलीप कुमार पुढे म्हणाले की, सायकॅट्रिस्ट लोकांनी हे सांगितले की, या गोष्टीतून सुटका करून घेण्याची गरज आहे. कारण हे व्यक्तीला वेगळ्याच प्रकारची ट्रॅजेडी देतात. ते लोक म्हणाले तुम्ही कॉमेडी ट्राय करा, एक्शन सिनेमे करा आणि तुमची इमेज बदलण्याचा प्रयत्न करा. फायदा होईल आणि मी प्रयत्नदेखील केले.
त्यानंतर दिलीप कुमार यांनी कॉमेडी सिनेमात काम करायला सुरूवात केली. आझाद, शबनम, कोहिनूर, राम आणि श्याम यांसारख्या सिनेमात काम करून दिलीप कुमार यांनी त्यांच्या इमेजसोबत मानसिक स्वास्थदेखील सुधारले.