‘ट्रान्सजेन्डर ब्युटी क्वीन’ निताषा बिस्वास करतेय छोट्या पडद्यावर डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 08:10 AM2018-07-12T08:10:58+5:302018-07-12T08:10:58+5:30
भारताची पहिली मिस इंडिया ट्रान्सक्विन बनण्याचा मान पटकावणारी निताषा बिश्वास छोट्या पडद्यावर डेब्यू करतेय.
भारताची पहिली मिस इंडिया ट्रान्सक्विन बनण्याचा मान पटकावणारी निताषा बिश्वास छोट्या पडद्यावर डेब्यू करतेय. होय, एमटीव्ही लवकरच येऊ घातलेल्या ‘डेटींग इन द डार्क’ या शोमध्ये ती दिसणार आहे. ‘डेटींग इन द डार्क’ हा एक रिअॅलिटी शो आहे. भारतीय युवांना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आलेल्या या शोमध्ये तीन तरूण आणि तीन तरूणीं संपूर्ण अंधारात एकमेकांसोबत डेटवर जातात आणि आपला पार्टनर शोधतात. भारताची पहिली मिस इंडिया ट्रान्सक्विन निताषाही डेट बनून या शोवर जाताना दिसणार आहे. उद्या शुक्रवारी तिच्यावर चित्रीत हा एपिसोड प्रसारित होतोय.
निताषाने गेल्यावर्षी मिस इंडिया ट्रान्सक्विन हा किताब जिंकला. निताषाचे बालपण इतर सामान्य मुलांप्रमाणे सुरु होते. पण वाढत्या वयासोबत अचानक आपल्यात महिलांसारख्या भावना वाढू लागल्याचे तिला जाणवले. निताषा मोठ्या हिंमतीने या सर्व गोष्टींना सामोरी गेली.
पण हा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत निताषाने हे सांगितले होते, ‘मी कोलकाताच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये मास कम्यूनिकेशनचे शिक्षण घेत होते. मला पत्रकार होण्याची इच्छा होती. माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगी शोधत होते. त्यांना माझे लग्न करुन देण्याची इच्छा होती. पण माझ्यासोबत काहीतरी चुकीचे होत असल्याचे मला वाटत होते़ एकदिवस मी मुलगा नाही तर मुलगी आहे आणि मला मुलासोबत लग्न करायचे आहे, असे मी मोठ्या हिंमतीने त्यांना सांगितले़ तेव्हा सर्वांनी मला वेड्यात काढले. मी डोक्यावर परिणाम झालाय, असेही ते बोलले़ तो काळ माझ्यासाठी भीषण होता़ पण नंतर त्यांनाही मी काय आहे, ते कळले़
त्यानंतर मी दिल्लीला आले आणि येथे जेंडर ट्रांसफार्मेशन करुन घेतले. या दरम्यानचा काळ म्हणजे प्रचंड तणावाचा होता. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. परंतू थांबून चालणार नव्हते. नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. मिस ट्रान्स क्विन स्पर्धेत भाग घेतला आणि यात विजेती ठरले.’