अंगावर शहारा आणणारा Tumbbadचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:56 PM2018-09-25T18:56:19+5:302018-09-25T19:00:12+5:30
'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तीन पिढ्यांभोवती ही कथा आहे.
आनंद एल राय निर्मित आणि गुणी अभिनेता सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'तुंबाड'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वेने केले आहे.
एक कुटुंब तुंबाड हे गाव सोडून जात असताना या ट्रेलरची सुरुवात होते. ‘सरकार मर गया’ (सरकार मेला) असं ते बोलत असतात. जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमधून चित्रपटाची कथा समजून येते. गावातील अशी एक जागा जिथे खजिना लपवून ठेवला आहे आणि त्या कुटुंबातील एक मुलगा तो शोधण्यासाठी धडपड करत असतो. या खजिन्याच्या शोधात असणाऱ्या गावातील बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो. एक भूत त्या खजिन्याचं रक्षण करतोय असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. 'वारशाने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर दावा करायचा नसतो,' असा संवाद या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो. ट्रेलरमधील एकंदरीत संवाद आणि दृश्ये पाहता प्रेक्षकांची घाबरगुंडी नक्कीच उडेल.
'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.