सुई-धागा चित्रपटाचा अनोखा लोगो, पंधरा कला प्रकाराच्या माध्यमातून बनविला लोगो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 12:24 PM2018-08-08T12:24:20+5:302018-08-08T12:51:40+5:30
'सुई - धागा: मेड इन इंडिया' चित्रपटाचा लोगो वरूण धवन आणि अनुष्का शर्माकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.
अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'सुई – धागा: मेड इन इंडिया' चित्रपटामधून हे दोघे एकत्र येत आहेत. या चित्रपटात हे दोघेही वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा लोगो वरूण आणि अनुष्काने प्रदर्शित केला असून हा लोगो अगदी वेगळा आहे. दरम्यान हा लोगो प्रदर्शित करत असताना अनुष्का आणि वरूण यांनी यामागील कथादेखील वेगळ्या अंदाजात लोकांसमोर आणली आहे. यशराजची टीम हा लोगो घेऊन देशभरातील अनेक कलाकारांकडे गेली आणि त्यांच्याद्वारे या स्टेनसिल्सवर एम्ब्रॉडरी बनवून घेण्यात आली. अशा तऱ्हेने हा युनिक लोगो तयार करण्यात आला आहे.
अनुष्का आणि वरूणने व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कानाकोपऱ्यातील कलाकारांकडून ही कलाकुसर करून घेण्यात आला आणि हा लोगो बनवण्यात आला. सर्वात पहिले यशराजची पूर्ण टीम वरूण आणि अनुष्काजवळ ही कलाकुसर करून घेण्यासाठी पोहचली होती. त्यांना दोघांनाही सुई – धाग्याने नाव आपल्या अंदाजात शिवण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ही टीम संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात फिरली आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
'सुई – धागा: मेड इन इंडिया' चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोमध्ये काश्मीरमधील कशीदा आणि सोजनी हा प्रकार, पंजाबमधील फुलकारी, उत्तर प्रदेशमधील फुलपट्टी, लखनऊमधील जरदोजी, राजस्थानमधील आरी, बंजारा आणि गोटा पट्टी अशा स्वरुपाच्या वेगवेगळ्या कलाकुसरींनी सजवण्यात आले आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.