Tanushree Dutta controversy Update: तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं नो कमेंट्स, कोणतीही प्रतिक्रिया न देता जोधपूरहून मुंबईकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 04:11 PM2018-10-06T16:11:18+5:302018-10-06T16:18:18+5:30
तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं अद्याप मौन कायम आहे. तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले. आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावरील या आरोपांमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नाना यांनी माध्यमांसमोर येऊन या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून नाना जोधपुरमध्ये 'हाऊसफुल्ल-४' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होते. त्यामुळे तनुश्रीच्या आरोपांबाबत नाना यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही. याच सिनेमाचं शुटिंग आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या नाना पाटेकर यांना माध्यम प्रतिनिधींनी जोधपूर विमानतळावर गाठलं.
पत्रकारांनी नाना यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं अद्याप मौन कायम आहे. तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत वकीलांची आपलीही टीम सज्ज असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईत परतल्यानंतर तरी नाना या सगळ्या प्रकरणावर मौन सोडणार का याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तनुश्रीच्या आरोपांवर नाना पहिल्यांदाच ‘या’ दिवशी जाहीरपणे बोलणार
येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये ते तनुश्रीने केलेल्या आरोपांची उत्तर देणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पहिल्यांदाच या आरोपांविषयी जाहीरपणे आपली बाजू मांडणार आहेत.