'व्हॉट अ फिल्म' म्हणत सलमानने 'मुळशी पॅटर्न'ची वाटच लावली, उपेंद्र लिमये स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:01 PM2023-08-07T17:01:59+5:302023-08-08T09:34:04+5:30
मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक बनवला 'अंतिम' चांगलाच आपटला. प्रविण तरडे म्हणाले, 'मी तर हिंमतच...'
मराठी सिनेमा 'आणीबाणी' सध्या चर्चेत आहे. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे अशा दिग्गज कलाकारांनी सिनेमात काम केलं आहे. प्रविण तरडे म्हटलं की मराठी मातीतला सिनेमा 'मुळशी पॅटर्न'च डोळ्यासमोर येतो. उपेंद्र लिमयेचीही यामध्ये महत्वाची भूमिका होती. मराठीमध्ये हा एक वेगळाच सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. या सिनेमाची भुरळ बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही पडली ती इतकी की त्याने हिंदीत त्याचा रिमेक केला.
'आणीबाणी' सिनेमाच्या निमित्ताने एका युट्यूब चॅनलवर प्रविण तरडे (Pravin Tarde) आणि उपेंद्र लिमये (Upendra Limaye) यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. तेव्हा 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) सिनेमाचा विषय निघाला. २०१८ साली आलेला हा सिनेमा प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा पाहून 'व्हॉट अ फिल्म' असं सलमान खान म्हणाला होता. 2021 साली सलमानने मुळशी पॅटर्नचा रिमेक बनवला. 'अंतिम द फायनल ट्रुथ' (Antim : The Final Truth) असं सिनेमाचं नाव. आयुष शर्माचीही सिनेमात मुख्य भूमिका होती. महेश मांजरेकर यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. मात्र हा सिनेमा काही कमाल दाखवू शकला नाही.
उपेंद्र लिमयेने 'अंतिम' मध्येही भूमिका केली होती. तो म्हणाला, ' व्हॉट अ फिल्म व्हॉट अ फिल्म केलेल्या सलमानने प्रत्यक्ष मुळशी पॅटर्न केला तर त्याची वाट लावून टाकली. मी दोन्ही सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे जितकी प्रामाणिकपणे मातीतली कलाकृती प्रविणने दाखवली ती सुपरफाईन करण्याच्या नावाखाली या लोकांनी त्यात जीवच काढून टाकला. जसंच्या तसं कॉपी केलं असतं तरी चाललं असतं. पण फाईनट्यूनच्या नावाखाली त्यातला आत्माच हरवला.'
तर प्रविण तरडे म्हणाले, 'आज मी जाहीरपणे सांगू का मी अजूनही अंतिम नावाचा पिक्चर मी पाहिला नाही मी डेअरिंगच करणार नाही. कारण माझ्या हृदयात मुळशी पॅटर्न आहे. लोकांकडून मला कळलं की नाही मुळशी पॅटर्नच भारी आहे. ज्यावेळी मी हिंदीत सिनेमा करेन तेव्हा तो हिंदीतला माईलस्टोन असेल.'