"मला 'ॲनिमल' करायचा नव्हता, पण...", उपेंद्र लिमयेंचा मोठा खुलासा, म्हणाले, "एकच सीन असल्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:05 PM2023-12-06T12:05:47+5:302023-12-06T12:06:45+5:30
"...म्हणून मी चित्रपटाला होकार दिला", उपेंद्र लिमयेंनी सांगितला 'ॲनिमल' मध्ये भूमिका साकारण्याचं कारण, म्हणाले, "संदीप रेड्डींना भेटल्यानंतर...",
सध्या जिकडेतिकडे रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील डायलॉग आणि काही सीन्सही व्हायरल झाले आहेत. 'ॲनिमल' सिनेमातील कलाकारांचही प्रचंड कौतुक होत आहे. रणबीर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात मराठी अभिनेता उपेंद्र लिमयेही झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी फ्रेडी हे पात्र साकारलं आहे.
'ॲनिमल'मध्ये अगदी काही मिनिटे स्क्रीनवर दिसणाऱ्या उपेंद्र लिमये यांनी त्यांच्या खास शैलीने सिनेमाला मराठी ठसका दिला आहे. त्यांच्या या भूमिकेची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. पण, खरं तर उपेंद्र लिमयेंनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्यांना ही भूमिका करायची नव्हती. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "संदीप रेड्डी यांच्या असिस्टंटचा मला फोन आला होता. उपेंद्र सर टी सीरिजचा एक चित्रपट येतोय. त्यात एक सीन आहे, तुम्ही कराल का? असं त्याने मला विचारलं होतं. एक सीन आहे तर मला इंटरेस्ट नाही. मी करणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्याने पुन्हा मला विचारलं. अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचा सिनेमा आहे, असं तो म्हणाला."
"अर्जुन रेड्डी हा चित्रपट मी पाहिला होता आणि तो मला प्रचंड आवडला होता. कॉलेजच्या दिवसात राम गोपाल वर्माचा पहिला सिनेमा शिवा बघितल्यानंतर मी प्रचंड प्रभावित झालो होतो. दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही असा तो सिनेमा होता. तसं मला अर्जुन रेड्डी बघितल्यावर झालं होतं. त्यामुळे मग मला थोडासा इंटरेस्ट आला. एक सीन आहे म्हणून तुम्ही भूमिका नाकारल्याचं मी सांगितलं आहे, पण तुम्हीच ती भूमिका करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचं मला संदीप रेड्डीच्या असिस्टंटने सांगितलं. त्यानंतर मी संदीप रेड्डी यांना भेटायला गेलो," असंही पुढे त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "त्यांना भेटल्यानंतरही नकार द्यायचंच मी ठरवलं होतं. मीटिंगमध्ये त्यांनी मला हा एक हाय वोल्टेज ड्रामा असल्याचं सांगितलं. त्यांनी ज्या पद्धतीने तो सीन मला सांगितला, खरं तर त्यामुळे मी या चित्रपटासाठी होकार द्यायचं ठरवलं. सीनमध्ये कुठेही व्हिएफएक्स वापरायचं नाही हेही त्याने ठरवलं होतं. त्यांनी मला मशीनचा फोटोही दाखवला. एका वेगळ्या लेव्हलचा तो सीन करायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. ते अॅक्शन सीक्वेन्स अजय-अतुलच्या गाण्यावर कट करणार, हे सगळं त्यांचं ठरलेलं होतं. त्यांनी हा सीन सांगितल्यावर मी स्पेशल अपिंरन्स म्हणून करायचं सांगितलं. तुला हवं ते करू...पाहिजे तर मी टायटलला तुला स्पेशल अपिंरन्स असं देतो. पण, तूच कर, असंही ते मला म्हणाले. त्यांनी माझी फार कामंही बघितली नव्हती. सरकार राजमधलं काम त्यांना प्रचंड आवडलं होतं."