‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 10:43 AM2019-05-02T10:43:40+5:302019-05-02T10:50:30+5:30
दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये.
गत महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ या लार्जर दॅन लाईफ चित्रपटाकडून करण जोहरशिवाय या चित्रपटाच्या स्टारकास्टला प्रचंड अपेक्षा होत्या. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स आॅफिसवरच्या कमाईने सगळ्यांना मोठा धक्का बसला. आलिया भट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये.
होय, एका व्हिडीओद्वारे वरूणने याबद्दलचे आपले दु:ख बोलून दाखवले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ या चित्रपटाकडून मला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला. मी यामुळे कमालीचा दु:खी आहे. खरे सांगायचे तर, मी कधी नव्हे इतका दुखावलो आहे. या अपयशावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नाहीये. जणू काही झालेच नाही, असे वागण्याचा सल्ला मला अनेकांनी दिला. पण कसे वागू, हे खरोखरच मला कळेनासे झालेय. अपयश हा आयुष्याचाच एक भाग आहे. अशात माझ्या काही मित्रांनी मला सोबत दिली. ते माझ्याकडे आलेत आणि चल बॅग पॅक कर, असे मला म्हणाले. कुठे जायचेय, असे मी त्यांना विचारले. यावर थायलंड असे त्यांनी मला सांगितले..., असे हा व्हिडीओ शेअर करताला वरूणने लिहिले आहे.
या व्हिडीओत वरूण आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करताला दिसतोय. याच ट्रिपमध्ये वरूणने आपला वाढदिवस साजरा केला होता.
याआधी आलिया भट हिने ‘कलंक’ फ्लॉप झाल्यावर प्रतिक्रिया दिली होती. जनतेचे न्यायालय सर्वात मोठे न्यायालय आहे. मी माझा चित्रपट कसा आहे, हे सांगू शकत नाही. कारण याचा निर्णय जनता घेते. लोकांना हा चित्रपट आवडला नाही, याचा अर्थ चित्रपट चांगला नाही, असेच मी म्हणेल. जनतेचा कौल स्वीकारून पुढे जाणे, हेच माझ्या हातात आहे, असे आलिया म्हणाली होती.