इतके सिनेमात काम करूनही या कारणामुळे येते वरुण धवनला दडपण ?
By सुवर्णा जैन | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:00+5:30
डान्सचे मला अक्षरक्षः वेड आहे. बालपणापासूनच मी डान्स करत आलोय. शामक दावर यांच्याकडून मी डान्सचे धडे घेतले आहेत. डान्सवर खूप खूप प्रेम आहे.
सुवर्णा जैन
डान्स हे माझं प्रेम आहे आणि त्यात सातत्याने प्रयोग करणं तसंच शिकण्याचा ध्यास आहे अशी भावना अभिनेता वरुण धवनशी दैनिक लोकमतनं खास संवाद साधला. यावेळी डान्स, अभिनय, मराठी प्रेम याविषयी दिलखुलास उत्तरं दिली.
तुला डान्स करणं किती आवडतं? तसंच चांगला डान्सर बनण्यासाठी तू किती मेहनत घेतो?
डान्सचे मला अक्षरक्षः वेड आहे. बालपणापासूनच मी डान्स करत आलोय. शामक दावर यांच्याकडून मी डान्सचे धडे घेतले आहेत. डान्सवर खूप खूप प्रेम आहे. मात्र स्ट्रीट डान्सर सिनेमात ज्या पद्धतीचा डान्स केला आहे तसा मी कधीही केलेला नव्हता. पहिल्यांदाच इतक्या कठीण डाम्स स्टेप्स केल्या. हे सगळं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. मात्र त्यामुळं मला खूप काही शिकता आलं. तरीही अजूनही मी परफेक्ट डान्स केलाच नाही असं मला वाटतं. कोणतंही काम असू द्या मला कायम वाटत राहतं की यांत काही ना काही उणीव राहिलीच आहे. कोणत्याही माझ्या कामावर मी समाधानी होत नाही. उलट तेच काम आणखी चांगलं कसं होईल याचाच विचार मी करत असतो.
डान्समध्ये तू कोणाला गुरू किंवा आदर्श मानतो?
डान्समध्ये क्रिस ब्राऊ, गोविंदा, प्रभूदेवा यांची डान्स शैली मला खूप खूप आवडते.
तू आजवर कॉमेडी, अॅक्शन, गंभीर अशा सगळ्या भूमिका तू केल्या आहेस. तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला जास्त मजा येते ?
सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मला आवडतात. त्यातल्या त्यात कॉमेडी, एंटरटेन्मेंट, ड्रामा या जॉनरच्या भूमिका मला करायला जास्त आवडतात.
युवा पिढी आणि बच्चेकंपनीमध्ये तुझी सगळ्यात जास्त क्रेझ आहे. या जबाबदारीचं दडपण येतं का?
या फॅन्सच्या प्रेमामुळेच आम्ही आहोत. त्यामुळे नक्कीच माझी जबाबदारी आणखी वाढते. माझ्या फॅन्सना भावेल अशा स्ट्रीट डान्सरसारख्या सिनेमांमध्ये काम करण्याला मी प्राधान्य देतो. जेणेकरुन बच्चेकंपनीनंसुद्धा हा सिनेमा पाहावा, त्यांना तो पसंत पडावा, त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं.
'जुडवाँ-२' रिलीज झाला त्यावेळी तुझी तुलना सलमानसोबत झाली. आता 'कुली नं. 1-२' येणार त्यावेळी साहजिकच तुझी तुलना गोविंदाशी केली जाईल. याकडे तू कसा पाहतो ?
तुलना तर होतेच. मात्र 'जुडवाँ -२' असो किंवा मग 'कुली नं. १-२' हे सिनेमा रिमेक नाहीत. तरीही जी तुलना होते त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. त्याची मी कधी चिंता आणि विचारही करत नाही. 'जुडवाँ-२' मध्ये सलमान आणि माझी तुलना झाली, पण असो ठीक आहे.
तुझ्या सिनेमांवर नजर टाकली तर दरवेळी तू काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ज्यावेळी तुझ्याकडे स्क्रीप्ट येते त्यावेळी कोणती गोष्ट पाहून तू ती स्वीकारतो?
सिनेमांची निवड करताना माझी भूमिका काय आहे याला मी प्रथम प्राधान्य देतो. कोणताही सिनेमा ऑफर झाल्यानंतर त्या सिनेमाची कथा काय आहे तसंच निर्माता आणि दिग्दर्शक कोण आहे हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.
बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्याची दुसऱ्याशी स्पर्धा आहे. तुझ्यासाठी तुझा स्पर्धक अभिनेता कोण आहे?
बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये कुठलीही स्पर्धा नाही. आमची ग्लोबली स्पर्धा सुरु आहे. खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आज स्पर्धा सुरु आहे. आज भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय सिनेमांना टक्कर देत आहे.
एक कलाकार म्हणून टीका किंवा क्रिटीसिजम सहन करायला तुला आवडतं का? तुझे सगळ्यात मोठे क्रिटीक कोण आहेत ज्यांची तुला भीती वाटते ?
माझे सगळ्यात मोठे टीकाकार माझे वडीलच आहेत. मात्र माझा भाऊ तर त्यांच्यापेक्षा जास्त मोठा क्रिटीक आहे.
स्ट्रीट डान्सर सिनेमाची कथा भारत पाकिस्तान यांच्यातील डान्समधील स्पर्धेवर आधारित आहे. सध्या दोन्ही देशांचे ताणलेले संबंध पाहता या कथेचा त्यावर काय परिणाम होईल?
भारत पाकिस्तान हा या कथेला दिलेला एक अँगल आहे. यांत फक्त स्पर्धा दाखवली गेली आहे. बाकी सध्या जे काही दोन्ही देशात घडत आहे त्याच्याशी याचा काहीही संबंध नाही.
तू हिंदीमध्ये विविध भूमिका साकारतोस, तर मराठी सिनेमांविषयी तुझे प्रेम लपून राहिलेले नाही, मराठीत कधी झळकणार ?
'कुली नं.१-२' या सिनेमात मी एक महाराष्ट्रीयन व्यक्तीरेखाच साकारली आहे. सिनेमात मी खूप मराठी बोललो आहे. याशिवाय शशांक खैतान यांच्या आगामी सिनेमात सात्विक लेले ही व्यक्तीरेखा साकारत आहे. त्यामुळे सलग दोन सिनेमांमध्ये मराठी व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. मराठी संस्कृती मला खूप आवडते. त्यामुळे जर कुणी मराठी सिनेमा ऑफर केला तर मी नक्कीच मराठीत काम करेन.