वरुण धवन २ वर्ष का गायब होता? म्हणाला, "त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:59 IST2024-12-23T12:58:58+5:302024-12-23T12:59:21+5:30
वरुण धवनचा 'बेबी जॉन' सिनेमा २ वर्षांनी येत आहे.

वरुण धवन २ वर्ष का गायब होता? म्हणाला, "त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला..."
अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' लवकरच रिलीज होत आहे. सुमारे २ वर्षांनंतर वरुणचा सिनेमा येत आहे. हा सिनेमा साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक अॅटलीने निर्मित केला आहे. यामध्ये वरुणची दुहेरी भूमिका असून त्याचे धमाकेदार अॅक्शन सीन्सही आहेत. वरुण सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका मुलाखतीत त्याने २ वर्ष गायब असण्याचं खरं कारण सांगितलं.
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत वरुण धवन म्हणाला, "मी कित्येक वर्षांपासून एका बबलमध्येच जगत होतो. मला आयुष्याचा अर्थ समजला असंच मला वाटत होतं. पण माझा ड्रायव्हर मनोजच्या मृत्यूने मला मोठा धक्का बसला. यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ३५ च्या आधीचा मी आणि नंतरचा मी यात खूप फरक आहे. मी एका काल्पनिक आयुष्यात जगत होतो जिथे मी स्वत:ला हिरो समजायचो. मी कोणालाही वाचवू शकतो कारण मी हिरो आहे. पण त्या दिवशी मी फेल झालो. त्याच्या मृत्युमुळे माझ्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यावर परिणाम झाला. माझं कामही खूप कमी झालं होतं. २ वर्षांनंतर आज माझा सिनेमा रिलीज होतोय. त्यामुळे मला नक्कीच त्या गोष्टीचा धक्का बसला होता."
तो पुढे म्हणाला, "मी धार्मिक मार्गालाही लागलो होतो. रामायण, भगवद् गीता वाचायला लागलो. एक माणूस म्हणून तुम्हाला पुढे जावंच लागतं हे मला कळालं. काही प्रसंगांचा तुमच्यावर नक्कीच परिणाम होतो पण म्हणून तुम्ही तिथेच अडकून राहू शकत नाही. मला बरेच प्रश्न पडले होते म्हणून मी सहजच रामायण, महाभारत, भगवद् गीता वाचायला लागलो."
वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज त्याच्या अत्यंत जवळचा होता. एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याने मनोजला स्टेजवरही आणले होते. २०२२ मध्ये मनोजला सेटवरच हृदयविकाराचा धक्का आला. वरुण आणि इतरांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्याला लीलावतीमध्ये दाखल केलं. मात्र वरुणजवळच त्याने प्राण सोडला.