"स्वत:ला ठार मारुन पुन्हा जन्म घेऊ का?" नेपोटिझमच्या आरोपांवर 'स्काय फोर्स' फेम वीर पहाडिया भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:48 IST2025-02-03T12:47:27+5:302025-02-03T12:48:06+5:30
"बड्या कुटुंबात जन्मालो आलो हे माझं भाग्यच", वीर पहाडिया स्पष्टच बोलला

"स्वत:ला ठार मारुन पुन्हा जन्म घेऊ का?" नेपोटिझमच्या आरोपांवर 'स्काय फोर्स' फेम वीर पहाडिया भडकला
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर पहाडियाने (Veer Pahariya) नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याचा 'स्काय फोर्स' सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. यामध्ये त्याला अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. वीर पहाडियाचा भाऊ शिखर पहाडिया हा जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे वीरही कायम चर्चेत होता. बड्या कुटुंबातून आल्यामुळेच त्याला ही संधी मिळाली असं अनेक लोक बोलत आहेत. यावर वीर पहाडियाने संताप व्यक्त केला आहे.
'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत वीर म्हणाला, "मी काय करु. मी अशा मोठ्या कुटुंबात जन्माला आलो हे तर माझं भाग्यच आहे. अभिनेता होणं हे माझं कायमच स्वप्न होतं. मग आता लोकांना खूश करण्यासाठी मी काय करु? स्वत:ला ठार मारु आणि पुन्हा जन्म घेऊ? असं नाही करु शकत ना?"
तो पुढे म्हणाला, "मी फक्त इतकंच सांगू शकतो की मी पूर्ण डेडिकेशनने काम करतो. जेणेकरुन मी इंडस्ट्रीत राहण्यासाठी सर्वांना पात्र वाटेल. मी नकारात्मकतेकडे बघतच नाही. कदाचित या सिनेमातून मी प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकलो नसेन पण मी माझ्या पुढच्या सिनेमातून नक्की सर्वांचं मन जिंकेन. मी या नकारात्मकतेला प्रेमात बदलण्याचा प्रयत्न करेन. आयुष्य छोटं आहे आणि नकारात्मकता पसरवणारे बरेच आहेत. त्यामुळे प्रेम हे एकच आहे जे सर्वांना जिंकून घेतं."
'स्काय फोर्स' मधील वीर पहाडियाच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. २४ जानेवारी रोजी सिनेमा रिलीज झाला. यामध्ये वीरसोबत सारा अली खान झळकली. त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली.