"जी घटना घडली ती दुर्दैवी, तरीही मी माफी मागतो", प्रणित मोरेवरील हल्याबाबत वीर पहारियाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:09 IST2025-02-05T09:08:24+5:302025-02-05T09:09:17+5:30
कॉमेडीयन प्रणित मोरेवर केला हल्ला चाहत्यांनी हल्ला केल्यावर वीर पहारियाची पहिली प्रतिक्रिया. काय म्हणाला बघा

"जी घटना घडली ती दुर्दैवी, तरीही मी माफी मागतो", प्रणित मोरेवरील हल्याबाबत वीर पहारियाचे स्पष्टीकरण
वीर पहारियाच्या (veer pahariya) समर्थकांनी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर (pranit more) सोलापूरमध्ये जीवघेणा हल्ला केला. सोलापूरमध्ये स्टँडअर शो झाल्यावर ११-१२ जणांचा जमाव प्रणितला भेटायच्या निमित्ताने आला. परंतु नंतर या लोकांनी प्रणितवर हल्ला केला. वीर पहारियावर स्टँडअपच्या माध्यमातून जोक केल्याने प्रणितवर हल्ला करुन त्याला धमकीही देण्यात आली. अखेर या प्रकरणावर अभिनेता वीर पहारियाने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला वीर?
प्रणित मोरेवर झालेल्या हल्ल्याची बातमी समोर येताच वीर पहारियाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. वीर म्हणाला की, "कॉमेडियन प्रणित मोरेसोबत जे काही घडलं त्यामुळे मला प्रचंड दुःख आणि धक्का बसलाय. मी एक स्पष्ट सांगू इच्छितो की, माझा यात कोणताही सहभाग नाही आणि मी या हिंसेचा विरोध करतो. ट्रोलिंगला सहजतेने स्वीकारणारा, त्यावर हसणारा आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांवरही प्रेम दर्शवणारा माझा स्वभाव असल्याने अशा कृत्यांना मी कधीच समर्थन देणार नाही."
वीर पुढे म्हणाला, "जी दुर्दैवी घटना घडली त्यासाठी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची मी माफी मागतो. असं कोणासोबतही घडू नये. या घटनेसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी मी वैयक्तिकरित्या लक्ष देईल." याशिवाय कोणत्याही प्रकारच्या हिंसेला मी समर्थन देत नाही असंही वीरने त्याच्या आणि प्रणितच्या चाहत्यांना स्पष्ट केलंय.
काय घडलं नेमकं?
प्रणित मोरेच्या सोशल मीडियावर या हल्ल्यासंबंधी माहिती देण्यात आलीय. "२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता सोलापूरमधील 24K Kraft Brewzz येथे प्रणितचा स्टँड-अप शो झाल्यानंतर ११-१२ जणांचा गट, चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला. त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली. त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला, ज्यामुळे तो जखमी झाला. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तनवीर शेख होता. त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा!" याचा थेट अर्थ म्हणजे पुन्हा जोक मारल्यास गंभीर परिणाम होतील." अशी धमकीही त्याला देण्यात आली.