वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:36 IST2019-05-27T18:32:03+5:302019-05-27T18:36:10+5:30
वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ अजय देवगण यांच्या घरी पोहोचले.

वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ
वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज सकाळी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वीरू देवगण हे अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असून त्यांचा मुलगा अजय देवगण आणि सून काजोल देवगण हे देखील अनेक वर्षांपासून बॉलिवूडचा भाग आहेत. त्यामुळे वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ अजय देवगण यांच्या घरी पोहोचले. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, संजय दत्त, सनी देओल, बॉबी देओल, आर्यन मुखर्जी, साजिद खान हे मंडळी वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच लगेचच अजयच्या घरी पोहोचले.
वीरू देवगण यांनी ८० हून जास्त चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करता आले. वीरू यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. ते या चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिकांमध्ये दिसले होते. त्यांनी फाईट मास्टर म्हणून काम करण्यासोबतच हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. अजय देवगण, काजोल आणि महिमा चौधरी यांची मुख्य भूमिका असलेल्या दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते.
वीरू देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देवगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात ते हजेरी लावत असत.
वीरू देवगण गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते आणि त्याचमुळे अजयने दे दे प्यार दे या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी काही मुलाखती देखील रद्द केल्या होत्या.