ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:59 PM2018-09-05T16:59:13+5:302018-09-05T17:01:33+5:30
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली आहे. त्यांना छातीच्या संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली आहे. त्यांना छातीच्या संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच्या आधी दिलीप कुमार यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आधी त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. दिलीप कुमार हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. दिलीप कुमार लवकर बरे होवोत, अशी कामना आम्ही करतो.
ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरचे अभिनय करताना दिसले. त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपट सुष्टीचा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.