'या' दिग्गज अभिनेत्याने 144 चित्रपटांमध्ये साकारली पोलिसाची भूमिका, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:26 PM2022-07-28T17:26:29+5:302022-07-28T17:36:21+5:30
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये नानाविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण, एक अभिनेता होऊन गेला, ज्याने सर्वाधिक चित्रपटांमध्ये फक्त पोलिसाची भूमिका साकारली.
मुंबई:बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये नानाविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता किंवा अभिनेत्री फार कमी वेळा एकाच प्रकारची भूमिका अनेकदा साकारतात. पण, भारतीय चित्रपट सृष्टीत असा अभिनेता होऊन गेला, ज्याने त्याच्या करिअरमध्ये 144 चित्रपटांमध्ये एकच भूमिका साकारली.
गिनीज बुकमध्ये नोंद
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून, दिवंगत अभिनेते जगदीश राज (Jagdish Raj) आहेत. जगदीश यांनी सुमारे 144 चित्रपटांमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या कारनाम्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने मोस्ट टिपिकल कास्ट अॅक्टर म्हणून निवड केली होती. 28 जुलै 2013 रोजी जगदीश राज यांचे मुंबईत निधन झाले, त्यांची आज नववी पुण्यतिथी आहे.
जगदीश यांचा परिचय
जगदीश राज यांचा जन्म 1928 मध्ये सरगोधा(आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांचे मूळ नाव जगदीश राज खुराना होते. सुमारे 144 चित्रपटांमध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आणि विश्वविक्रमही केला. जगदीश राज यांनी 1954 मध्ये अभिनय विश्वात प्रवेश केला. पोलिसाच्या भूमिकेसोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही साकारली. त्यांनी सुरुवातीच्या काळात सीमा, फुंटूश आणि सीआयडीसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सीआयडीमध्येच ते पहिल्यांदाच पोलीस अधिकारी झाले. याशिवाय, त्यांनी दीवार, डॉन, शक्ती, सिलसिला आणि आईना यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री अनिता राज ही त्यांची मुलगी आहे. अनिता राजने 1981 मध्ये 'प्रेम गीत' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनिता राजचे बहुतेक चित्रपट धर्मेंद्र यांच्यासोबत होते. त्याच्या लोकप्रिय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात गुलामी, जरा सी जिंदगी, जमीन आसमान आणि मास्टरजी सारखे चित्रपट आहेत. तिने छोटी सरदारनी या मालिकेतही काम केले आहे.