Rita Bhaduri : ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 08:41 AM2018-07-17T08:41:44+5:302018-07-17T09:57:49+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन झाले आहे
मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे मंगळवारी (17 जुलै) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेता शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रीटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी विकारामुळे त्यांचे निधन झाले आहे. गेल्या 10 दिवसांपासून रीटा यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराविरोधात कडवी झुंज देत होत्या.
रीटा यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. सध्या 'निमकी मुखिया'मध्ये त्या आजीची भूमिका साकारत होत्या. ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली. रीटा या किडनी विकारानं ग्रस्त होत्या. त्यांना प्रत्येक दिवशी डायलिलिस करावे लागत होते. मात्र कौतुकास्पद बाब म्हणजे या कठीण दिवसांतही त्यांनी आपल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये खंड पडू दिला नाही. सेटवर मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्या आराम करायच्या. 'निमकी मुखिया'मधील स्टारकास्टही त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते. त्यांच्या उपचारांच्या वेळानुसार अन्य कलाकार आपल्या कामाचे वेळापत्रक सांभाळून घ्यायचे.
'वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांना घाबरुन काम करणं का सोडावं. काम करणे आणि त्यात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करत बसणं मला पसंत नाही. यासाठी मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते,' असे काही दिवसांपूर्वी रीटा त्यांनी म्हटलं होते.
Actor Rita Bhaduri passes away at the age of 62. (Pic source: IMDB) pic.twitter.com/mz4xwHCXlx
— ANI (@ANI) July 17, 2018
'साराभाई वर्सेस साराभाई', 'अमानत', 'एक नई पहचान', 'बायबल की कहानियाँ', यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर 'सावन को आने दो', 'राजा', 'लव्ह', 'विरासत', 'घर हो तो ऐसा' यांसारख्या अनेक सिनेमांमध्येही त्यांनी दमदार अभिनय केला होता. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे.