पद्मश्री नको, अपमान वाटतो...! ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:11 PM2022-01-26T12:11:20+5:302022-01-26T12:12:37+5:30
Padma Shri Awards: लोकप्रिय गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee ) यांनी पद्मश्री पुरस्कार (Padma Shri ) स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामागील कारणही विशद केलं आहे.
केंद्र सरकारने काल मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पद्म पुरस्कारांची केली. मात्र या पुरस्कारांच्या घोषणेनंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हिंदी चित्रपटामध्ये आपल्या गायकीनं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee ) यांनी पद्मश्री पुरस्कार (Padma Shri ) स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामागील कारणही विशद केलं आहे. मला हा पुरस्कार घेणं हा अपमान वाटतो,अशी प्रतिक्रियाही संध्या मुखर्जी यांनी दिली आहे.
संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता यांनी सांगितलं की, केंद्र सरकारच्या वतीने एका अधिकाऱ्याने दिल्लीहून फोन करून माझ्या आईला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. मात्र माझ्या आईने हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. गेल्या आठ दशकांहून अधिक काळ गायन केल्यानंतर वयाच्या 90 व्या वर्षी पद्मश्री स्वीकारणं हे तिच्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे. ज्युनिअर कलाकारांसाठी पद्मश्री हा योग्य सन्मान आहे. मात्र संध्या मुखर्जी यांच्यासारख्या दीर्घकाळ गायकी करणार करणाऱ्या ज्येष्ठ गायिकेला या वयात हा पुरस्कार देणं योग्य नाही़ हा तिचा अपमान आहे. त्यामुळे हा पुरस्कार आम्हाला नको आहे. याला कृपया करुन कोणताही राजकीय रंग देऊ नये, असेही त्यांनी सांगितलं.
संध्या मुखर्जी यांनी अनिल विश्वास, मदन मोहन, एस़डी़ बर्मन, रोशन आणि सलील अशा अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्यांना ‘बंग विभूषण’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.