Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 15:29 IST2023-10-13T15:29:04+5:302023-10-13T15:29:35+5:30
दमदार संवाद आणि तगडा अभिनय, विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'च्या टीझरमुळे वाढली सिनेमाची उत्सुकता

Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच विकीने 'सॅम बहादूर'मधील त्याचा लूक शेअर केला होता. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. विकी कौशलचा लूक आणि पोस्टर पाहून या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशल भारतीय सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. विकी कौशल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत आहेत. विकीने भारतीय लष्कर अधिकारी असलेल्या सॅम माणेकशॉ यांची भूमिका अगदी चोखपणे साकारल्याचं टीझरमधून दिसत आहे. या भूमिकेत विकी कौशल अगदी चपखल बसल्याचं टीझरमधून स्पष्ट दिसत आहे.
टीझरमध्ये सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्याील काही प्रसंगांची झलक पाहायला मिळत आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या टीझरमधील संवाद लक्षवेधी आहेत. विकी कौशलने अगदी उत्तमरित्या संवादफेक केल्याचं टीझरमध्येच दिसून येत आहे. "सैनिक त्याच्या वर्दीसाठी प्राणही देऊ शकतो", "लष्करच माझं जीवन आहे", "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं हे सैनिकाचं कर्तव्य आहे" अशा संवादांमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली जात आहे.
'सॅम बहादूर' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम बहादूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. १ डिसेंबरला बहुचर्चित 'सॅम बहादूर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.