Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से
By देवेंद्र जाधव | Updated: February 3, 2025 15:04 IST2025-02-03T15:03:30+5:302025-02-03T15:04:26+5:30
छावा सिनेमाच्या निमित्ताने लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला (chhaava movie, vicky kaushal)

Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (chhaava movie) हा हिंदी सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी रिलीज येत आहे. अभिनेता विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना (rashmika mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लक्ष्मण उतेकर (laxman utekar) आणि विकी कौशलने 'लोकमत' शी साधलेला मनमोकळा संवाद
'छावा'च्या शूटिंगचा अनुभव आणि भावुक करणारा प्रसंग कोणता?
लक्ष्मण उतेकर: शूटिंदरम्यान एका सीनसाठी आम्ही रायगडाचा सेट उभा केला होता. महाराजांच्या सुवर्णसिंहासनाबद्दल आपण ऐकलंच आहे. अगदी तसंच अष्टमुखी सिंहासन आम्ही तयार केलं होतं. छत्रपती संभाजीराजांचा सिंहासनावर स्थानापन्न होण्याचा तो सीन होता. आजूबाजूला तेव्हा ७०० लोक होते. राजे चालत येतात, सिंहासनाकडे बघतात आणि शंभूराजांना शिवरायांचे शब्द आठवतात.
'शंभू हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा', हे आठवत पायऱ्या चढून संभाजी महाराज सिंहासनावर बसतात. आम्ही सहसा २-३ टेकशिवाय जास्त टेक घेत नाही. पण त्या सीनचे १५ टेक झाले. कारण विकी सिंहासनाकडे चालत येत असताना त्याच्या डोळ्यात घळाघळा अश्रू यायचे. आता राजा दरबारात रडू शकत नाही. म्हणून मी त्याला सांगायचो की, डोळ्यात अश्रू नकोत. योगायोग म्हणजे ज्या दिवशी आम्ही शूट केलं त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्यादिवशी सेटवर सगळेच भावुक झाले.
'छावा'च्या संपूर्ण प्रवासात तुम्ही विकीला सातत्याने 'राजे' असंच संबोधत आहात, त्याबद्दल काय सांगाल?
लक्ष्मण उतेकर: 'छावा'च्या शूटिंगआधी जी तयारी सुरु झाली तेव्हापासून मी त्यांना 'राजे' म्हणतोय. विकी नाही तर मी शंभूराजांशीच बोलतोय अशीच माझी भावना होती. कारण मी त्यांना त्या अवतारात पाहिलंय. राजे मला दरदिवशी फोन करतात पण मी नाही करत. कारण मला वाटतं राजे व्यस्त असतील. तो आदर नुसता शब्दात नाही तर तो काळजात आणि डोळ्यांमध्ये आहे. ही भावना मी शब्दात न मांडता येणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील वडील मुलाच्या नात्यामधून तुला काय शिकायला मिळालं?
विकी कौशल: मी लक्ष्मण सरांना कायम विचारायचो की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात काय फरक आहे. तर सर म्हणायचे की, छत्रपती शिवराय हे प्रभू श्रीराम आहेत तर छत्रपती संभाजी महाराज हे सिंह आहेत. त्या दोघांचं जे नातं होतं आणि छत्रपती शिवरायांचा शंभूराजांच्या आयुष्यावर किती खोल प्रभाव होता, हे तुम्हाला प्रत्येक प्रसंगात दिसतं.
लक्ष्मण उतेकर: छत्रपती शंभूराजांच्या संपूर्ण आयुष्यावर महाराजांचा प्रभाव होता. शेवटच्या क्षणीही औरंगजेब शंभूराजांचा जो छळ करत होता तेव्हाही त्यांच्या मनात शिवरायांचे विचार होते.
ऐतिहासिक सिनेमा केल्यानंतर लोक आपल्याला त्याच भूमिकेमुळे ओळखतील असा विचार मनात आला का?
विकी कौशल: माझ्यासाठी फार सौभाग्याची गोष्ट असेल की, मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी ओळखला जाईल. त्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. पण अभिनेता म्हणून हेच आव्हान असतं की, प्रत्येक भूमिका साकारताना तुम्हाला लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे. त्यामुळे ही एक मोठी जबाबदारी आहे. जेव्हा कोणी विकी कौशल म्हणून ओळखतं तेव्हा नक्कीच छान वाटतं. पण जेव्हा कोणी भूमिकेमुळे मला ओळखत असेल की, 'अरे हा तोच मुलगा आहे', तेव्हाही आनंद वाटतो.
ट्रेलरमध्ये दिसणारी हर हर महादेव गर्जना शूट झाली तेव्हाचा सेटवरचा अनुभव कसा होता?
लक्ष्मण उतेकर: भोरच्या वाड्यात हा सीन शूट झाला. साधारण पाचशे लोक तिथे होते. प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता. स्क्रीप्टमध्ये जय भवानी आणि हर हर महादेव एवढीच वाक्य होती. पण विकीने बोलण्याच्या प्रवाहात 'पार्वती पतये हर हर महादेव' असं उच्चारलं. स्क्रीप्टमध्ये ते लिहिलेलं नव्हतं. पण त्या वाक्याची एनर्जी खूपच भन्नाट होती.
विकी कौशल: या सीनचं वैशिष्ट्य म्हणजे याची आम्ही रिहर्सल केली नव्हती. सहसा प्रत्येक सीनच्या आधी रिहर्सल व्हायची. मी जेव्हा सेटवर गेलो तेव्हा पाचशे लोक तयार होते. कॅमेरा तयार होता त्यामुळे मला थेट टेक करायचा होता. तो सीन काय होणार, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती. अनपेक्षितरित्या पहिल्या टेकमध्येच तो सीन इतका चांगला झाला होता.
महाराष्ट्र आणि मराठी भाषेविषयी तुला किती प्रेम आहे?
विकी कौशल: माझा जन्म मुंबईत मालाडमध्ये येथे मालवणी कॉलनीत झाला. दहावीपर्यंत शाळेत मी मराठी विषय शिकलो आहे. मला इंग्रजीपेक्षा मराठीत जास्त मार्क्स मिळाले होते. माझे बरेच मित्रही मराठीच होते. त्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळायचो. त्यामुळे मला मराठी समजते. तसंच जो व्यक्ती मुंबईत, महाराष्ट्रात लहानाचा मोठा झाला आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं माहितच असतं. मी पंजाबी कुटुंबात जन्माला आलो असलो तरी आहे पण आमच्यासाठी महाराज हे दैवतच आहे.