Vicky Kaushal : विकी कौशलची बालपणीची मैत्रीण 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, एकाच वर्गात शिकायचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:46 IST2024-08-01T15:40:17+5:302024-08-01T15:46:39+5:30
बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटासोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळेसुद्धा चर्चेत असतात.

Vicky Kaushal : विकी कौशलची बालपणीची मैत्रीण 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, एकाच वर्गात शिकायचे!
बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटासोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळेसुद्धा चर्चेत असतात. त्यातील काही कलाकारांची दोस्ती बालपणापासून म्हणजेच शाळेपासून आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit) हे दोघे वर्गमित्र (Ridhima Pandit Vicky Kaushal studied together) होते. दोघेही मुंबईतील एका शाळेत शिकले आहेत. याचा खुलासा रिद्धिमा पंडितने केलाय.
'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली, 'विकी कौशल माझा शाळेतला मित्र आहे. विकी व मी एकाच बाकावर बसायचो. त्याने सातवीनंतर शाळा बदलली व मी आठवीनंतर शाळा बदलली. आता आम्ही जेव्हाही भेटतो. तेव्हा खूप प्रेमाने भेटतो. तो शाळेत सर्व शिक्षकांचा आवडता होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत तो खूप कमी बोलायचा. तो अजिबात खोडकर नव्हता. आता त्याला पाहिल्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. सनी आमच्यापेक्षा वर्षभराने लहान आहे. जेवणाच्या सुट्टीत तो टिफिन बॉक्स घेऊन नेहमी आमच्या वर्गात यायचा'.
रिद्धिमा ही फक्त विकी कौशलच नाही तर अरबाज खानची पत्नी शुरा खान हिची खास मैत्रीण आहे. तसेच ती व रवीना टंडनदेखील चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा रिद्धिमा त्यांच्याबरोबर पार्टी करताना दिसून येते. दरम्यान, रिद्धिमा पंडित क्रिकेटपटू शुबमन गिलशी लग्न करणार असल्याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण रिद्धिमाने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं.
विकी कौशल सध्या त्याच्या 'बॅड न्यूज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. विकी केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही रॉकस्टार मानला जातो. मुंबईतील एका छोट्याशा चाळीत वाढलेला विकी त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. विकी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.