सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:22 AM2022-01-03T11:22:08+5:302022-01-03T11:23:51+5:30
Vicky's Legal Trouble : ‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकनं फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तिने विकी विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal ) कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. पण आता त्याच्यावरचं संकट टळलं आहे. होय, ‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान (sara ali khan) दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकनं फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तिने विकी विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. माझ्या मालकीची स्कूटी आणि ज्या बाईकवर विकी इंदूरच्या रस्त्यावर सारा अली खानसोबत फिरताना दिसला त्याचा नंबर एकच असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला होता. पण आता या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे. हे संपूर्ण प्रकरण गैरसमजातून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
होय, विकी कौशलने वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक तक्रारदाराच्या वाहनाच्या नंबर प्लेटशी जुळत नाही. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार इंदूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
विकी कौशल आणि सारा अली खान त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसले होते. ती बाईक प्रॉडक्शन हाऊसची होती. हा गैरसमज बोल्टमुळे झाला होता. त्या बोल्टमुळे बाईकचा नंबर 1 ऐवजी 4 दिसत होता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
संबधित तक्रारीनंतर तपासासाठी पोलिस थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचले होते आणि तेथे पोहोचल्यानंतर त्यांना वेगळ्या दुचाकीचा क्रमांक मिळाला. उपनिरीक्षक राजेंद्र्र सोनी यांनी सांगितलं की, नंबर प्लेटच्या तपासादरम्यान आम्हाला कळलं की नंबर प्लेटवरील बोल्टमुळे सर्व गैरसमज निर्माण झाला आहे. त्या बोल्टमुळे नंबर 1 हा नंबर 4 सारखा दिसतो आणि वापरलेली नंबर प्लेट ही प्रॉडक्शन हाऊसचीच आहे, त्यामुळे आमच्या तपासामध्ये आम्हाला काहीही बेकायदेशीर आढळलेलं नाही.
आगामी ‘लुका छुप्पी 2’ चित्रपटाचं चित्रीकरण मध्य प्रदेशात सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान लीड रोलमध्ये आहेत.
काय आहे प्रकरण
विकी व साराचे इंदूरच्या रस्त्यावर बाईकवर फिरतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते पाहून इंदौरच्या बाणगंगा भागातील सुंदर नगरमधील रहिवासी जयसिंग यादव यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. विक्की कौशलने चालवलेल्या बाईकचा नंबर बनावट असल्याचा दावा त्यांनी केला होता. आपण त्याच नंबरची स्कुटी 25 मे 2018 रोजी एरोड्रोम येथील शोरूममधून विकत घेतली. जे वाहन वापरलं जात आहे ते बनावट आहे. चित्रीकरणात वापरलेला दुचाकीचा नंबर त्यांच्या स्कुटीचा आहे, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.