'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?
By कोमल खांबे | Updated: February 24, 2025 11:36 IST2025-02-24T11:35:52+5:302025-02-24T11:36:26+5:30
'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया काय होती? सिनेमाचे लेखक म्हणाले...

'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?
'छावा' सिनेमामुळे विकी कौशल चर्चेत आला आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत आणि बलिदानाचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमात विकी कौशले छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 'छावा' सिनेमाचं लेखन एका मराठमोळ्या तरुणाने केलं आहे. ओंकार महाजन असं या तरुणाचं नाव असून 'छावा' सिनेमाच्या लेखकाच्या टीमचा तो एक भाग होता.
ओंकार महाजनने नुकतीच लेट्स अप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने 'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया काय होती याबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, "छावा सिनेमाच्या निमित्ताने विकी कौशलसोबत आम्ही पहिल्यांदा काम केलं. आम्ही या सिनेमाचे लेखक आहोत. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर आणि विकी कौशलचं कास्टिंग झाल्यानंतर त्याच्याबरोबर आमच्या काही मिटींग झाल्या. त्याच्यासोबतची पहिली मिटींग मला आठवते. आम्ही तिन्ही लेखक तेव्हा तिथे होतो. आणि लक्ष्मण उतेकर सर स्वत: तिथे होते. आणि सरांनीच तेव्हा ती स्क्रिप्ट वाचून दाखवली होती. मध्यातरांनंतर आमचा कॉफी ब्रेक झाला आणि त्यानंतर पुन्हा सरांनी पुढची स्क्रिप्ट वाचून दाखवली".
'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशल भावुक झाल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, "मला अजूनही आठवतंय विकीचे डोळे अक्षरश: भरून आले होते. तो ढसाढसा रडला असं मी म्हणणार नाही. पण, त्याचे डोळे मात्र भरुन आले होते. त्याचं ते फिलिंग त्यादिवशी आम्हा सगळ्यांना दिसलं. तो उठून उभा राहिला आणि त्याने सगळ्यांसमोर फक्त हात जोडले. आणि विकी म्हणाला की माझ्यासमोर तुम्ही बोलण्यासाठी काही ठेवलंच नाही".