लग्न वगैरे काही नाही हो...! विकी व कतरिनाच्या लग्नाबद्दल मावस बहिणीचा भलताच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 10:29 AM2021-11-26T10:29:29+5:302021-11-26T10:32:18+5:30
Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding : कतरिना कैफ व विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. साहजिकच कॅट व विकीचे चाहते क्रेझी झाले आहेत. पण ही बातमी कदाचित चाहत्यांची निराशा करू शकते.
कतरिना कैफ ( Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. अगदी कॅट व विकी कुठे लग्न करणार, या लग्नात कोण कोण गेस्ट येणार इथपासून तर कतरिनाच्या हातात कोणती मेहंदी रचली जाणार इथपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. कॅट व विकीचे चाहते साहजिकच क्रेझी झाले आहेत. पण यादरम्यान आलेली एक बातमी कदाचित चाहत्यांची निराशा करू शकते. होय, विकी कौशलच्या मावस बहिणीने असा काही खुलासा केलाय की, वाचून सगळेच अवाक् झालेत.
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत विकीची मावस बहीण डॉ. उपासना वोहरा यांनी विकी व कॅटचा लग्नाचा कुठलाही प्लान नसल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उपासना म्हणाल्या, ‘विकी व कतरिनाच्या लग्नाबद्दलच्या बातम्या मीडियाद्वारे पसरवल्या जाणा-या निव्वळ अफवा आहेत. लग्न वगैरे काहीही नाही. या सगळ्या अफवा आहे. खरंच लग्न होणार असेल तर ते घोषणा करतीलच. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सर्रास अफवा पसरवल्या जातात आणिा काही दिवसांतच या अफवा हवेत विरतात. नुकतीच मी भावासोबत (विकी)बोलले. त्यावेळी असं काहीही नसल्याचं त्यानं मला सांगितलं. बाकी मला यावर फार काही बोलायचं नाही. पण तूर्तास तरी लग्न होत नाहीये...’
उपासना ही विकीची मावस बहिण आहे. याचवर्षी जुलै महिन्यात उपासना यांचं लग्न झालं होतं. या लग्नाला विकी हजर होता.
जाणकार म्हणतात...
विकीच्या मावस बहिणीने लग्नाच्या चर्चा धुडकावून लावल्या असल्या तरी बॉलिवूड इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, हा सुद्धा लग्न सीक्रेट ठेवण्याचा प्लान असू शकतो. कदाचित विकी व कतरिनाने कुटुंबीयांना लग्नाबद्दल कुठलीही माहिती उघड न करण्यास बजावलं असू शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान विकी व कतरिना लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठी राजस्थानच्या सवाई माधोपूरचं सिक्स सेंसेस फोर्ट हॉटेल बुक करण्यात आलं आहे. त्याआधी मुंबईत कोर्ट मॅरेज होणार असल्याचंही कळतंय. अर्थात अद्याप कतरिना व विकीनं याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.