विकी कौशल या आजारामुळे आहे अनेक वर्षं त्रस्त, त्यानेच केला याविषयी खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:06 IST2020-02-19T15:03:31+5:302020-02-19T15:06:47+5:30
Bhoot Part One The Haunted Ship Movie : विकी कौशलनेच या गोष्टीविषयी नुकतेच सांगितले.

विकी कौशल या आजारामुळे आहे अनेक वर्षं त्रस्त, त्यानेच केला याविषयी खुलासा
विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकीने नुकतीच लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एका खास गोष्टीविषयी सांगितले.
भूताचा अनुभव कधी आला आहे का असे विकीला विचारले असता त्याने सांगितले की, भूताचा अनुभव मला कधीच आलेला नाही. पण एका गोष्टीला मी नक्कीच घाबरतो. ते म्हणजे स्लीप पॅरालिसिस या आजाराला... गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराला मी तोंड देत आहे. मी खूप थकलेलो असेल तर मला याचा त्रास होतो. या आजारात तुमचे मन जागे झालेले असते. पण शरीर हे निंद्रावस्थेतच असते. त्यामुळे तुमचे हात-पाय तुम्ही हलवू शकत नाही. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. तुमच्यावर कोणीतरी बसले आहे असे सतत तुम्हाला वाटते. ही अवस्था काही सेकंदासाठी असते. पण यात प्रचंड भीती वाटते.
भूतः द हाँटेड शीपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा, भूमी पेडणेकर यांना पाहायला मिळाले होते.
भूतः द हाँटेड शीप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.
भूतः द हाँटेड शीप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.