'छावा'नंतर विकी कौशलच्या नव्या सिनेमाची चर्चा, समोर आलं पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:49 IST2025-04-06T14:49:15+5:302025-04-06T14:49:30+5:30
'छावा' आणि 'लव्ह अँड वॉर'नंतर विकी कौशल कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? जाणून घ्या...

'छावा'नंतर विकी कौशलच्या नव्या सिनेमाची चर्चा, समोर आलं पोस्टर
Vicky Kaushal Upcoming Movie: विकी कौशल (Vicky Kaushal) बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. मुंबईतील एका छोट्याशा चाळीत वाढलेला विकीचा अभिनय थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडतो. अलिकडेच त्याच्या 'छावा' चित्रपटानं जगभरात धुमाकूळ घातला. 'छावा'मध्ये विकी कौशलने स्वराज्याचे धाकले धनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. शंभूराजांच्या लूकमध्ये विकी अगदी शोभून दिसला आहे. 'छावा' 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला. आता 'छावा'नंतर विकीच्या पुढच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
विकी लवकरच आपल्या आगामी 'एक जादूगर' (Ek Jaadugar) या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. यामध्ये विकी कौशल हा एका जादूगाराच्या भूमिकेत दिसत आहे. विकी हा गडद हिरव्या रंगाच्या व्हेल्वेट सूट, आकर्षक हॅट आणि हातात चमकणारी जादूची कांडी धरून उभा असल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय. चित्रपटाचं पोस्टर पाहून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत शुभेच्छा देत आहेत. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्यातरी या सिनेमाविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
'एक जादूगर'हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक शुजित सरकार दिग्दर्शित करत आहेत. त्यांनी यापुर्वीपिकू आणि ऑक्टोबर सारखे उत्तम चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटाची निर्मिती रायझिंग सन फिल्म्स करत आहे. विकी कौशलच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट आणि रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. यामध्ये दीपिका पदुकोणचाही कॅमिओ रोल असल्याची माहिती आहे. 'छावा'नंतर विकीला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.